कोल्हापूर : लॉकडाऊन शिथिल झाल्या झाल्या जिल्हा परिषदेतील गर्दीही वाढली आहे. दरम्यान, अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या कार्यालयातील आठ कर्मचाऱ्यांचे घोडावत विद्यापीठ येथील कोरोना रुग्णालयात सोमवारी स्वॅब घेण्यात आले आहेत.
जोपर्यंत लॉकडाऊन होते तोपर्यंत जिल्हा परिषदेत बारा तालुक्यातून महत्चाच्या कामांसाठी येणाऱ्यांची संख्या ६०-६५ इतकी असायची. मात्र लॉक डाऊन उठल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी ३०० नागरिकांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावली. यामध्ये बांधकाम आणि आरोग्य विभागामध्ये काम असणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
जिल्हा परिषदेत येणाऱ्यांची स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंद करण्यात येते. या ठिकाणी दोन पुरूष आणि दोन महिला कर्मचारी नियुक्त आहेत. सोमवारी जिल्हा परिषदेत या सर्वांवर मोठा ताण आला. जर नाही सोडले तर जिल्हा परिषद सदस्यांना फोन करून सांगितले जाते. सदस्यही फोन करून आता सोडा म्हणून सांगत असल्याने कर्मचाऱ्यांची कोंडी होत आहे.
अध्यक्ष बजरंग पाटील शनिवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्या कार्यालयातील तीन सहाय्यक, चार शिपाई, एक चालक या आठ जणांचे स्वॅब तपासण्यासाठी देण्यात आले आहेत. घोडावत विद्यापीठात या सर्वांनी स्वॅब दिले आहेत. सोमवारी अध्यक्षांच्या दालनाकडे जाणारा दरवाजाच बंद करण्यात आला होता.