कोल्हापूर ‘गोकूळ’ची निवडणूक झाल्यामुळे सोमवारी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावली. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे देखील मसुरीहून प्रशिक्षण संपवून हजर झाले आहेत.
गेले दहा, बारा दिवस ‘गोकूळ’च्या निवडणुकीमुळे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी अभावानेच उपस्थित होते. नाही म्हणायला अध्यक्ष बजरंग पाटील सातत्याने येत होते. मात्र अन्य पदाधिकारी त्यांच्या त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारात होते. रविवारी ‘गोकूळ’चे मतदान झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी सोमवारी हजेरी लावली. अध्यक्ष बजरंग पाटील, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, समाजकल्याण समितीच्या सभापती स्वाती सासने या देखील उपस्थित होत्या. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या आठवडाभर इकडे आल्या नव्हत्या. मतदान संपल्यामुळे जिल्हा परिषद सदस्यही उपस्थित असल्याचे दिसून आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे त्यांच्या प्रशासकीय प्रशिक्षणासाठी मसुरी येथे गेले होते. त्यांच्या प्रशिक्षणातील भारत भेट आणि विदेश दौरा स्थगित करण्यात आल्याने ते लवकर परत आले आहेत. त्यांनी सकाळी कार्यभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष बजरंग पाटील आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलेले अजयकुमार माने यांच्याशी चर्चा केली.
चौकट
प्रत्येक दालनात ‘गोकूळ’चीच चर्चा
पदाधिकाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या दालनात ‘गोकूळचे काय होणार अशीच चर्चा होती. मग कुठल्या तालुक्यात सत्तारूढ पुढे आणि कुठल्या तालुक्यात विरोधकांच्या जोडण्या यशस्वी झाल्या याची साग्रसंगीत चर्चा सुरू असल्याचे दिसून येत होते.