कोल्हापूर : शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असून ते आज, रविवारी जिल्हा परिषदेबाबत पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करणार असल्याने, त्यांच्या निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. कॉँग्रेससह भाजपने सत्तेचा दावा केल्याने गुंता निर्माण झाला आहे. दुधवडकरांच्या निर्णयाने तिढा सुटण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निकालानंतर त्रिशंकू अवस्था तयार झाली आहे. सत्तेचा लंबक स्थानिक आघाड्या व शिवसेनेच्या भूमिकेवर फिरत असल्याने सत्तेबाबत कमालीची उत्सुकता आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसने सत्तेसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. स्थानिक आघाड्यांना सोबत घेऊन सत्तेपर्यंत पोहोचण्याची त्यांची धडपड आहे. भाजप, जनसुराज्य व ताराराणी आघाडीनेही प्रयत्न सुरू केले असून, त्यांचे आकड्यांचे घोडे २५-२६ च्या पुढे जात नाही. शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी तयारी केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष या पदांची २१ मार्चला निवड होणार असली तरी मंगळवारी (दि. १४) पंचायत समिती सभापतींच्या निवडी आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. आज, शासकीय विश्रामगृह येथे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, आमदार चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील, राजेश क्षीरसागर यांची महत्त्वाची बैठक होत आहे. शिवसेनेचे पुन्हा ‘वेट अॅँड वॉच?’स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आताच पत्ते खोलण्यापेक्षा शेवटच्या क्षणी निर्णय जाहीर करून भाजप व दोन्ही कॉँग्रेसना धक्का देण्याची रणनीतीही दुधवडकर खेळू शकतात. त्यामुळे बैठक होईल आणि निर्णय न घेताच पुन्हा ‘वेट अॅँड वॉच’ची भूमिका घेण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. ...तर पंचायत समित्यांमध्येही सत्ताशिवसेनेने दोन्ही कॉँग्रेसना पाठबळ देण्याचा निर्णय घेतला तर पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घ्यावे लागणार आहे. जिल्हा परिषदेत सत्तेची पदे जास्त आहेत; पण पंचायत समितीमध्ये सभापती व उपसभापती असल्याने वाटणी करताना पेच निर्माण होऊ शकतो. दादांचा ‘हबकी’ डाव?पाच राज्यांतील निकालांनंतर शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा करताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार आहे. आमची ४० सदस्यांची जोडणी झाल्याचा दावा केला. ‘भाजता’, सर्व स्थानिक आघाड्या व शिवसेना असे ४० संख्याबळ झाले असून, फक्त औपचारिकता उरल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे; पण दोन्ही कॉँग्रेसच्या पातळीवरील घडामोडी पाहता, महापालिकेप्रमाणेच दादांचा येथेही ‘हबकी’ डाव नाही ना? अशीच चर्चा सुरू आहे.
दुधवडकर यांच्या निर्णयाकडे लक्ष
By admin | Published: March 11, 2017 11:49 PM