कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्षसन्मान देणाऱ्यांशी युती : अरूण दुधवडकर कोल्हापूर : शिवसेनेशिवाय कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोणाचीही सत्ता येवू शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे भाजप असो किंवा कॉंग्रेस यांपैकी जे आम्हांला सन्मान देतील त्यांच्याशी युती केली जाईल असे सांगत संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांनी शिवसेनेच्या भूमिकेविषयीचे औत्सुक्य आणखी वाढवून ठेवले आहे. येथील शासकीय विश्रामगृहावर रविवारी दुधवडकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. यावेळी सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार, मुरलीधर जाधव, आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर उपस्थित होते. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे दहा सदस्य निवडून आले असून त्यांच्याशिवाय कॉंग्रेस, राष्ट्रवादी किंवा भाजप, जनसुराज्य शक्ती सत्ता स्थापन करू शकत नसल्याने शिवसेनेच्या भूमिकेला मोठे महत्व आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष होणार असा ठाम विश्वास महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर दुधवडकर यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जाते.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2017 12:22 PM