कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या नजरा आता मुंबईकडे लागल्या आहेत. मंगळवार (दि. १९) सकाळी ११.३0 वाजता अध्यक्षपदासाठीच्या आरक्षणाची सोडत निघणार आहे. याबाबतचे पत्र दुपारीच व्हायरल झाल्यानंतर जिल्हा परिषदेत नव्या आरक्षणाचीच चर्चा सुरू झाली.विद्यमान अध्यक्षा शौमिका महाडिक यांची मुदत याआधीच संपली होती; मात्र विधानसभेच्या तोंडावर ती चार महिने वाढवून दिली होती. ही मुदत २१ जानेवारी रोजी संपते. या पार्श्वभूमीवर आता मंगळवारी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर परिषद सभागृह क्रमांक ४ येथे ही सोडत निघणार आहे.जरी विद्यमान अध्यक्षांची मुदत २१ पर्यंत संपणार असली, तरी त्याआधीच अध्यक्षपदाच्या निवडणुका लागण्याचे संकेत असून, १५ डिसेंबरपर्यंत ही सर्व प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्या पद्धतीने महापौर निवडणुका तातडीने लावण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर अध्यक्षपदाचीही निवडणूक लवकर लागणार असल्याचे सांगण्यात आले.सत्तासंघर्ष होणार तीव्रराज्यात आजघडीला दोन्ही काँग्रेससह शिवसेना सत्तेसाठी प्रयत्न करत आहे. जर या तीनही पक्षांची सत्ता राज्यात आली, तर कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तांतर अटळ असल्याचे मानले जात आहे. भाजपला पाठिंबा दिलेले काही सदस्य उघडपणे नाराजी व्यक्त करत असून, त्याचा फटका येणाऱ्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. आरक्षण काय पडणार आणि त्यासाठी पात्र सदस्यांमधून कुणाचे नाव पुढे येणार, यावर सत्तासंघर्षाची तीव्रता अवलंबून राहणार आहे.