सदाशिव मोरे
आजरा : गवसे ( ता. आजरा ) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी बैठक घेऊन उमेदवारीचा लिलाव केला आहे. पाच उमेदवारीच्या लिलावातून ८ लाख ५५ हजार जमा झाले आहेत. ही रक्कम ग्रामदैवत रवळनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी वापरली जाणार आहे. बिनविरोध झालेल्या जागांचे उमेदवारी अर्ज पाळक करून वाजत-गाजत मंगळवारी दाखल केले जाणार आहे.
आजरा- आंबोली रस्त्यावर असलेले पश्चिम भागातील मोठं गावं. याच गावच्या गायरानात आजरा साखर कारखाना उभा आहे. गवसे व आल्याचीवाडी अशी ग्रुप ग्रामपंचायत आहे. गवसे येथून ६, तर आल्याचीवाडी येथून ३ सदस्य असे एकूण ९ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. गावचे ग्रामदैवत रवळनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गेले १० वर्षे सुरू आहे. आजपर्यंत देणगी व लोकवर्गणीतून या मंदिराचे काम सुरूच आहे. पैशांअभावी या मंदिराचे काम सध्या थांबले आहे.
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांची बैठक झाली. बैठकीत उमेदवारीचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे रात्री लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. प्रभाग एकमधील जनरल पुरुषासाठी १ लाख ६० हजार, तर प्रभाग २ मधील सर्वसाधारण पुरुषासाठी १ लाख ५५ हजार बोली, तर तीन महिला निवडून देण्यासाठी प्रत्येकी १ लाख ९० हजारांची बोली अंतिम करण्यात आली. गेल्या १० वर्षांत इतर मागासवर्ग पुरुष व जनरल पुरुष असे सरपंचपदाचे आरक्षण होते. यावेळी सर्वसाधारण महिलेला सरपंचपदाची संधी मिळणार असल्याने महिलेसाठी लिलावाची रक्कम वाढली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, तर इतर मागासवर्ग महिलेसाठी स्वखुशीने जास्तीत जास्त रक्कम देणाऱ्या महिलेला उमेदवारीची संधी मिळणार आहे. सहापैकी पाच जागेवर लिलावातून उमेदवारी, एका जागेसाठी स्वेच्छेने रक्कम व आल्याचीवाडी येथील तीन जागेचीही बिनविरोध निवड करण्यासाठी गवसेकर ग्रामस्थ एकवटले आहेत.
........
लिलावातून उमेदवारी निश्चित झालेल्या व्यक्तींचे अर्ज मंगळवारी गावात पाळक करून भरले जाणार आहेत. लिलावाचे पैसे मंदिरासमोरील चौकावर सोमवारी ठेवून गाऱ्हाणे घातले जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गावातून आजऱ्यापर्यंत वाजत-गाजत मिरवणूकही काढली जाणार आहे. लिलावातून उमेदवारी, अर्ज भरणेसाठी पाळक व वाजत-गाजत मिरवणूक याची चर्चा आजरा तालुक्यात जोरदार सुरू आहे.