शिरोळ : अनधिकृतपणे गौण खनिजाची वाहतूक केल्यावरून जप्त करण्यात आलेल्या २८ वाहनांची लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. शिरोळच्या तहसीलदारांनी याबाबतची कार्यवाही सुरू केली असून येत्या २५ मार्चला नवीन प्रशासकीय इमारत येथे या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. यातून ९२ लाख ७५ हजार रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.
महसूल विभागाच्या भरारी पथकाने शिरोळ तालुक्यात अनधिकृतपणे गौण खनिजाची वाहतूक करून सुमारे ३४ वाहने जप्त केली आहेत. नवीन व जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त करण्यात आलेली वाहने ठेवण्यात आली आहेत. यामध्ये ट्रॅक्टर, जेसीबी, ट्रक, डंपर यांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून संबंधित वाहनमालकांकडून दंडात्मक रक्कम जमा करण्यात आलेली नाही. त्यामुळे या दंडाची रक्कम वसूल करून शासनाकडे जमा करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून सुमारे २८ वाहनांची किंमत ठरविण्यात आली आहे. ९२ लाख ७५ हजार त्याची एकूण किंमत झाली आहे. यामुळे महसूल विभागाकडून या वाहनांचा लिलाव होणार आहे. निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.