कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) गाड्यांचा ३ सप्टेंबर रोजी लिलाव काढण्यात आला आहे. यामध्ये संचालकांच्या नऊ ‘स्कार्पिओ’सह १६ गाड्यांची विक्री केली जाणार आहे. विशेष म्हणजे अध्यक्षांसाठी घेतलेली दुसरी ‘टोयोटा इनोव्हा’ गाडीची विक्रीही केली जाणार आहे. विरोधकांसह दूध उत्पादकांमधून होणाऱ्या टीकेनंतर संचालक मंडळाने महिन्यापूर्वी गाड्या विक्रीचा निर्णय घेतला होता.‘गोकुळ’च्या निवडणुकीपासून विरोधक आक्रमक झाले असून, संचालकांच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचे बारीक लक्ष आहे. संघाची निवडणूक असो अथवा इतर कोणत्याही निवडणुकीत ‘गोकुळ’चा कारभार हाच प्रचाराचा मुद्दा ठरत आहे.
लोकसभा निवडणुकीत तर कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील व आमदार चंद्रदीप नरके यांनी मल्टिस्टेटच्या मुद्यावरून रान उठविले होते. त्याचा फटका धनंजय महाडिक यांना बसला. त्यानंतर संचालक मंडळात खळबळ उडाली आणि विधानसभेसाठी इच्छुक असलेले ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी संचालकांच्या गाड्या बंद करण्याची मागणी लावून धरली. त्यानंतर गाड्यांची विक्री करण्याचा निर्णय संचालक मंडळात घेण्यात आला.संचालकांसाठी १0 स्कार्पिओ गाड्या होत्या. त्यांच्याबरोबरच तीन आॅईल टॅँकर, महिंद्रा पिकअप, टाटा रेफ्रिजरेटर व्हॅनही लिलावात काढली आहे. २०१५ ला अध्यक्षांसाठी घेतलेली ‘टोयोटा इनोव्हा’ गाडीचाही लिलाव करण्यात येणार आहे. अध्यक्षांना नवीन गाडी घेतल्याने ही गाडी मुंबई कार्यालयाकडे होती.या गाड्यांचा लिलाव ३ सप्टेंबरला गोकुळ शिरगाव येथील दूध प्रकल्प येथे होणार आहे. वाहने खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्यांना गुरुवारी (दि. २९) वाहने पाहण्यास उपलब्ध होणार आहे, तर लिलावात भाग घेण्यासाठी १0 हजार रुपये बयाणा रक्कम लिलावापूर्वी भरणे बंधनकारक आहे.
गाड्यांच्या विक्री किमती गुलदस्त्यातलिलावाच्या प्रसिद्धीमध्ये गाड्यांच्या संपूर्ण माहितीसह अपसेट प्राईज दिली जाते; पण संघाच्या लिलाव प्रक्रियेत त्यांनी अपसेट प्राईज गुलदस्त्यात ठेवल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.