कुरुंदवाड : शहरातील भाजीपाला लिलाव आज मंगळवारपासून येथील एस. पी. हायस्कूलच्या मैदानावर सकाळी सात ते दहा या वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्याधिकारी कक्षात व्यापारी संघटना, शेतकरी संघटना व दलाल यांच्यात सोमवारी सायंकाळी बैठक झाली. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक असल्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी यावेळी सांगितले.
लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभरापासून शहरातील भाजीपाला लिलाव बंद होता. लिलाव होत नसल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. शिवाय भाजीपाला व्यावसायिकांचीही आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यात आल्याने शहरातील भाजीपाला लिलाव पूर्ववत सुरू करण्याची मागणी व्यापारी, शेतकरी वर्गातून होत होती.
त्यामुळे मुख्याधिकारी जाधव यांनी याबाबत निर्णय घेण्यासाठी व्यापारी, दलाल, शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी प्रत्येक प्रतिनिधींनी भाजीपाला लिलाव पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. त्यामुळे मुख्याधिकारी जाधव यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत ठरलेल्या वेळेत भाजीपाला लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला.