सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या थकीत ७ कोटी ३१ लाख १२ हजार १५९ रुपयांच्या वसुलीसाठी चार थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव जाहीर करण्यात आला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे अवसायकांनी स्पष्ट केले आहे. वसंतदादा सहकारी बॅँकेच्या अवसायनाच्या काळात आजअखेर १४० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. यापैकी १३० कोटी रुपये विमा कंपनीचे देणे भागविण्यात आले आहे. अजून विमा कंपनीस २९ कोटी ९३ लाख रुपये द्यायचे आहेत. मुदलापोटी अजूनही १६८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. व्याजासहीत ही थकबाकी ३८० कोटींच्या घरात जाते. थकबाकीपोटी १३० कोटी रुपये ठेवीदारांचे देणे असून, ३० कोटी रुपये विमा कंपनीचे देणे आहे. यातील १०६ कोटींच्या ठेवी संस्थांच्या असून, उर्वरित व्यक्तिगत ठेवीदारांचे पैसे आहेत. १ लाखावरील ठेवींची रक्कम ३० कोटींच्या घरात आहे. विमा कंपनीचे ३० कोटी रुपये देणे दिल्यानंतर बॅँकेमार्फत एक लाखावरील ठेवीदारांची रक्कम देण्यास सुरुवात होणार आहे. शनिवारी अवसायकांनी चारजणांच्या मालमत्ता लिलावाची सूचना प्रसिद्ध केली. यामध्ये उमदी (ता. जत) शांताबाई दाजी शेवाळे, लक्ष्मीबाई गोपाळ शेवाळे, शोभा महादेव शेवाळे, मिरज येथील नंदकिशोर पोल्ट्री फार्म, हरिपूर येथील मे. वैशाली आईस फॅक्टरी, तासगाव येथील मे. साई कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालमत्तांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)ठेवीदारांनीच फिरविली पाठ८५ हजार खातेदारांच्या किरकोळ ठेवींची एकूण रक्कम १२ कोटी ६८ लाख इतकी आहे. प्रत्येकाच्या खात्यावर असलेल्या किरकोळ रकमा बॅँक देणार असतानाही त्या नेण्यासाठी कुणीही येत नसल्याचे चित्र आहे. २५० रुपयांपासून दीड हजार रुपयांपर्यंतच्या या किरकोळ रकमा तातडीने मिळणे शक्य असतानाही त्या बॅँकेकडे पडून आहेत.
वसंतदादा बॅँकेतर्फे मालमत्तांचा लिलाव
By admin | Published: January 28, 2017 11:27 PM