कोल्हापूर : शताब्दीच्या उंबरठ्यावरील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रेक्षागृहाची सध्या जी व्यवस्था आहे, त्यामुळे शेवटच्या काही रांगांमधील प्रेक्षकांना रंगमंचच दिसत नसल्याने त्यांना फक्त ‘कानसेन’ व्हावे लागते. ही समस्या लक्षात घेऊन प्रेक्षकांच्या सोयीच्या दृष्टीने अभिनेते मोहन जोशी यांनी सुचविलेला प्रेक्षागृहातील पायऱ्यांचा उपाय अधिक संयुक्तिक आहे. मात्र, या इमारतीच्या मूळ ढाच्यात बदल करायचे नाही अशी पुरातत्त्वची सूचना असल्याचे महापालिकेने हा बदल करण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे नूतनीकरणानंतर सुसज्ज झालेल्या नाट्यगृहात तरी बॅक बेंचर्स प्रेक्षकांना रंगमंचावरील सादरीकरण प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद मिळणार का, हे पडदा उघडल्यानंतरच कळेल. फेबु्रवारी २०१४ पासून केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाचे नूतनीकरण सुरू आहे. खासबाग मैदानाचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. नाट्यगृहाचीही अंतर्गत डागडुजी, एसी, साऊंड सिस्टीम ही कामे पूर्ण झाली आहेत. आता रंगमंचावरील व्यवस्था आणि खुर्च्या असे काम शिल्लक आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेते मोहन जोशी यांनी नाट्यगृहाची पाहणी करून काही सूचना केल्या. त्यापैकी एक सूचना अशी होती की, रंगमंचाचा पडदा आणखी पुढे घेण्यात यावा; यामुळे कलाकारांना व संस्थांना रंगमंचाची पूर्ण जागा सादरीकरणासाठी वापरता येईल. तसेच दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे सध्या नाट्यगृहात शेवटी बसलेल्या नागरिकांना स्टेजवरचे काहीच दिसत नाही. त्यांना फक्त ‘कानसेन’ व्हावे लागते. त्यामुळे खुर्च्यांची मांडणी करण्याआधी तिथे पायऱ्या करण्यात याव्यात. अशा रचनेमुळे अगदी शेवटच्या प्रेक्षकालाही रंगमंचावरील सादरीकरण पाहता येईल. या सूचना करताना जोशी यांनी सध्या सुरू असलेल्या नूतनीकरण कामावर समाधानही व्यक्त केले. शिवाय कोल्हापूरच्या कलाकारांनाही हे काम योग्यरीतीने होत असल्याचे नोंदविले आहे. एप्रिल-मेअखेर नाट्यगृहाचे काम पूर्ण होईल, असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे या सूचना कितपत विचारात घेतल्या गेल्या आहेत, हे नूतनीकरण पूर्ण झाल्यावरच समजेल. नाट्यगृह नव्याने बांधले जात असेल, तर त्यात अनेक सोयींना वाव असतो. मात्र, केशवराव भोसले नाट्यगृहाची इमारत हेरिटेज यादीत असल्याने मूळ ढाचा न बदलता नूतनीकरण करण्याच्या सूचना पुरातत्त्व खात्याने दिल्या आहेत. रंगमंचाच्या खाली मोठी विहीर आहे. खासबागमधील पाण्याचा प्रवाह या विहिरीच्या दिशेने आहे शिवाय परिसरात खड्डा मारू तिथे पाणी आहे. चॅनेलचा ढाचा बदलला तर पाणी साचण्याची भीती आहे.. त्यामुळे खुर्च्यांची सूचना आम्ही अमलात आणू शकत नाही. - अनुराधा वांडरे, प्रकल्प अधिकारी, महापालिकाकोल्हापुरात अखिल भारतीय नाट्यपरिषदेची शाखा १९८५ मध्ये सुरू झाली. मात्र, गेली २० वर्षे संस्थेला हक्काची जागाच काय, कार्यालयही नाही. या नाट्यगृहाच्या वरच असलेल्या कलादालनात परिषदेच्या बैठका व्हायच्या; पण आता नाट्यगृहाचे रूपडेच पालटणार असल्याने जोशी यांनी नाट्यगृहाच्या आवारात संस्थेसाठी कार्यालय द्यावे, अशी विनंती केली आहे. नाशिक, पुणे, रत्नागिरी, मुंबई येथील नाट्यगृहांच्या आवारात नाट्यपरिषदेचे कार्यालय आहे. तशीच सोय भोसले नाट्यगृहातही व्हावी. यामुळे येथे नाट्यक्षेत्राविषयी हालचालीही सुरू राहतील, शिवाय नाट्यगृहाच्या व्यवस्थापनातही मदत करता येईल. - प्रफुल्ल महाजन, नाट्यवितरक
प्रेक्षकांना नाटक ‘ऐकावे’ लागणार
By admin | Published: January 28, 2015 11:42 PM