कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) गेल्या २५ वर्षापासूनचे लेखा परीक्षण करावे, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी आज, गुरूवारी केली.
विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनंतर शासनाने गोकुळचे सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखा परीक्षण करण्याचे आदेश लेखा परीक्षा मंडळाचे विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नुकतेच दिले आहे. यावर पत्रकारांनी विचारल्यानंतर आमदार पाटील यांनी ही मागणी केली. लेखापरीक्षण सध्याचेच का? पंचवीस वर्षपासूनचे करा असेही ते म्हणाले. गोकुळमध्ये यापूर्वी अनेक वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. सन २०२१ मध्ये आमदार पाटील आणि माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सत्तांतर केले. यामध्ये विरोधी आघाडीतून शौमिका महाडिक संचालिका झाल्या.
महाडिक यांनी गोकुळच्या वार्षिक सभेनंतर चार महिने मी शांत होते. संघात चाललेल्या गैरकारभाराचे पुरावे जमवत होते. त्याचे फळ लवकरच समोर येईल, असे सोशल मीडियातून स्पष्ट केले होते. त्यानंतर लेखा परीक्षणाचा आदेश आला. यामुळे याला राजकीय वास येत आहे. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार पाटील यांनी गोकुळच्या २५ वर्षापासूनच्या लेखा परीक्षणाची मागणी करीत मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.