कोल्हापूर : कोरोना आणि लसीकरण काळात झालेल्या खर्चाबाबत अनेक ठिकाणी तक्रारी झाल्यामुळे राज्यभर ऑडिट सुरू करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणून कोल्हापूरजिल्हा परिषदेत गेले तीन दिवस ऑडिट सुरू आहे. त्याआधी एक दिवस सीपीआरमध्येही तपासणी करण्यात आली. तीन ऑडिट कंपन्यांना याचे कंत्राट देण्यात आले असून, जिल्हावार वेळापत्रकही ठरवण्यात आले आहे.सुरुवातीच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याचे ऑडिट ६ मार्च ते ११ मार्च २४ या काळात होणार होते. परंतु या पथकाला अन्य जिल्ह्यांत उशीर झाल्याने १५ मार्चपासून जिल्ह्यातील ऑडिटला सुरुवात झाली आहे. एप्रिल २०२० नंतर जगभर कोरोनाची लागण सुरू झाली. भारतात तर पहिल्या लाटेवेळी हाहाकार उडाला. कारण, वैद्यकीयदृष्ट्या शासनाच्या अनेक आरोग्य संस्था या कमकुवत होत्या. ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असणारी जिल्ह्या-जिल्ह्यांत मोजकी शासकीय रुग्णालये होती.कोल्हापूर जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व खरेदी प्रक्रियेची जबाबदारी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यावर सोपवली. यावेळी हातमोजे, सॅनिटायझर, मास्क याची कोट्यवधी रुपयांची खरेदी सुरू झाली. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर हे साहित्य आवश्यक असल्याने आणि तातडीची गरज यामुळे अनेक राजकीय नेते, त्यांचे सगेसोयरे, कार्यकर्ते यांनी कंपन्या काढून मालाचा पुरवठा सुरू केला.या सगळ्या कारभारात ज्यांना संधीच मिळाली नाही त्यांनी आणि ज्यांना हा गैरकारभार सहन झाला नाही, अशांनी तक्रारी सुरू केल्या; परंतु अचानक उद्भवलेले आरोग्य संकट असल्याने आपत्कालीन कायद्याचा आधार घेत या सगळ्यांना ‘क्लीन चीट’ देण्याचेच धोरण पुढे आले. परंतु तरीही यातील वस्तुस्थिती समोर यावी, यासाठी हे ऑडिट सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार सीपीआरनंतर आता जिल्हा परिषदेत ही तपासणी सुरू करण्यात आली आहे.
कागलकर हाऊसमध्ये ठिय्याया ऑडिट पथकातील तीन सदस्यांनी गेले तीन दिवस जिल्हा परिषदेसमोरील कागलकर हाऊसमध्ये ठिय्या मारला असून, तत्कालीन डॅम नितीन लोहार आणि औषधनिर्माण अधिकारी युवराज बिल्ले यांच्याकडून त्यांना आवश्यक फाइल्स आणि कागदपत्रे उपलब्ध करून दिली जात आहेत.