इचलकरंजी : १४ आॅगस्ट रोजी महाराष्ट्राच्या विधानभवनासमोर, तसेच मंत्रालयात शेतकऱ्यांचा बाजार भरविला जाणार आहे. खऱ्या अर्थाने हाच शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यदिन असणार आहे. सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. येथील घोरपडे नाट्यगृहात स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्षाच्यावतीने रविवारी मंत्री खोत यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजाराम देसाई होते. यावेळी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री खोत म्हणाले, १४ आॅगस्टला संत सावळा माळी शेतकरी बाजाराच्या माध्यमातून मंत्रालयात भाजीपाला विकला जाणार आहे. आम्हाला मंत्रालयात येण्यास ज्यांनी विरोध केला, त्यांच्या नाकावर टिच्चून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी लवकरच कोल्हापुरात एक निर्यात केंद्र उभारले जाईल. खासदार राजू शेट्टी यांनी, शेतकऱ्यांचा एक सदा मंत्रालयात गेला. पुढच्या वेळी या संख्येत भर पडली पाहिजे, असे नियोजन करूया. तसेच शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेची मुदत वाढवून घेण्यात सदाभाऊंना पहिले यश मिळाले आहे. याबरोबरच त्यांनी आता मंत्रालयात थांबून राहून शेतकरी व आमच्याकडून येणाऱ्या विविध योजना व कामांचा पाठपुरावा ज्या-त्या मंत्र्यांकडून करवून घेऊन सर्वांना न्याय द्यावा. तसेच उसाच्या आंदोलनात आता आमदार, खासदारांसह मंत्रीही सहभागी होणार. मात्र, ऊस परिषदच अंतिम निर्णय घेणार. दरम्यान, मंत्री खोत यांचा शाल व श्रीफळ देऊन खासदार शेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कामात असणारे गजानन महाजन-गुरुजी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष भगवान काटे, पंचायत समिती सदस्य अश्विनी कांबळे, सावकार मादनाईक, जालंदर पाटील, आदी उपस्थित होते. क्षारपड योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ दुष्काळग्रस्त व क्षारपड भागातील शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आले असून, एका योजनेच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. याचा पश्चिम महाराष्ट्रालाही लाभ व्हावा, येथील दोन जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश करावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. शिवारात राबत राहणाऱ्या शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत, अशी ग्वाहीही मंत्री खोत यांनी दिली.
१४ आॅगस्टला मंत्रालयात शेतकऱ्यांचा बाजार भरणार
By admin | Published: August 08, 2016 12:32 AM