बुबनाळ : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरू असताना शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी-औरवाड पुलावरून माती मुरूम वाहतूक सुरू आहे. एकीकडे कोरोनाचे कारण दाखवून प्रशासन व पोलीस सर्वसामान्यांवर कारवाई करीत असताना या बेकायदेशीर माती, मुरूम वाहतूक करणाऱ्यांवर का कारवाई करीत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नृसिंहवाडी कृष्णा नदीपलीकडील कवठेगुलंद, शेडशाळ, गौरवाड, औरवाड आदी परिसरात बेकायदेशीर माती उत्खनन सुरू आहे. नृसिंहवाडी-औरवाड पुलावरून यांची बेकायदेशीर वाहतूक दररोज सुरू आहे. तर कर्नाटक चोरट्या मार्गाने मुरूम वाहतूक ही केली जात आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात वाढणारे रूग्ण बघता लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सकाळी आठ ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. असे असताना बिनदिक्कतपणे माती वाहतूक सुरू आहे. यावर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन केव्हा कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. नृसिंहवाडी-औरवाड पुलाजवळ मरगाई चौकात पोलीस नाका आहे. विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई केली जाते. मग कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या माती वाहतुकीवर का कारवाई होत नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
फोटो - ३००४२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - नृसिंहवाडी-औरवाड मार्गावरून सुरू असलेली बेकायदेशीर माती वाहतूक.