कोल्हापूर : येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना फोनवरून दिलेल्या धमकीचा फोन इंटरनॅशनल नव्हे, तर तो स्थानिक असल्याच्या निष्कर्षांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. फोनवरून धमकी देणारी व्यक्ती हुशार आहे. त्याने सायबर तंत्राचा वापर करून देसाई यांना फोन केला आहे. त्याचा छडा लवकरच लावण्याचे आदेश अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्या यांना दिले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. देसाई यांना ‘मी आॅस्ट्रेलियातून रवी पुजारी बोलतोय, ‘अंबाबाई’च्या मंदिरातील पुजाऱ्यांच्या जिवावर उठलाय तुम्ही, हे थांबवा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’ अशी धमकी दिली. पोलिस प्रशासनाने या धमकीची गांभीर्याने दखल घेत फोन कुठून आला, त्याची माहिती सायबर सेलकडून घेण्याचा प्रयत्न केला. भारत संचार निगम (बीएसएनएल) विभागाच्या मुख्य कार्यालयाने देसाई यांच्या लँडलाईन नंबरवर आलेल्या फोन नंबरची यादी पोलिस अधीक्षकांना सोमवारी दिली. त्यांनी ती यादी पाहून देसाई यांना आलेल्या वेळेतील फोन नंबर तपासले. संबंधित व्यक्ती ही स्थानिक असून ती हुशार आहे. त्याने सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून विशिष्ट नंबरवरून देसाई यांना फोन केला आहे. ज्या वेळेत देसाई यांना फोन आला, त्या वेळेत एक फोन ब्लँक दिसत आहे. सायबर तंत्रज्ञानाचा वापर केल्याने तो नंबर नोंद होऊ शकलेला नाही. पोलिस हा नंबर शोधून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक अनिल देशमुख करत होते. हा गुन्हा अतिसंवेदनशील असल्याने हा तपास अप्पर पोलिस अधीक्षक एस. चैतन्या यांच्याकडे दिला आहे. त्यांना या प्रकरणाचा लवकरच छडा लावण्याचे आदेश दिले असल्याचे देशपांडे यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी) सीसीटीव्ही फुटेजदेसाई यांना आलेले पत्र मंगळवार पेठेतील पोस्टातून आले आहे. त्यामुळे या पोस्ट कार्यालयाच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत.
आॅस्ट्रेलियातून नव्हे ‘तो’ फोन स्थानिकच
By admin | Published: April 27, 2016 1:04 AM