लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ची निवडणूक थांबविण्यासाठी सत्तारूढ गटाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत मजल मारली. मात्र, न्यायालयानेही दूध उत्पादकांच्या भल्याचा निर्णय दिला. आता त्यांनी मात्र जागतिक कोर्टात जाऊ नये, असा टोला पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत लगावला. सत्ताधारी मंडळींचा आत्मविश्वास डळमळीत झाला असून ही निवडणूक व्हावी, हे नियतीलाच मान्य होते, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
मंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘गोकुळ’ निवडणुकीची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्व प्रकारचे प्रोटोकॉल पाळून मतदारांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने निवडणूक यंत्रणा प्रक्रिया पूर्ण करेल. ‘गोकुळ’ दूध उत्पादकांचा राहावा हेच नियतीच्या मनात असून आता सत्ताधाऱ्यांनी जागतिक कोर्टात जाऊ नये, एवढीच अपेक्षा आहे. सभासद जे निर्णय देतील त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे सभासदांचा विजय असून हा संघ उत्पादकांच्या मालकीचा व्हावा हेच परमेश्वराला मान्य आहे. यावेळी ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, बाबासाहेब चौगले उपस्थित हाेते.
पॉझिटिव्ह सभासद पीपीई कीट घालून मतदानाला
‘गोकुळ’चे काही ठरावधारक कोरोनाबाधित असल्याचे कळते. त्यांचा मताचा अधिकार दिला जाईल, अशा बाधित सभासदांना पीपीई कीट घालून मतदान करण्याची संधी दिली जाणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.