कोल्हापूर : दलित वस्ती निधीतून भाजप तालुकाध्यक्षांना केवळ कामे सुचविण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना कायदेशीरदृष्ट्या निधीच देता येत नाही, असे स्पष्टीकरण कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी शनिवारी दिले.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आठवड्यापूर्वी भाजप तालुकाध्यांना याबाबत अधिकार असल्याचे सत्तारूढ जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीत सांगितले होते. त्यानंतर विरोधकांनी हल्लाबोल करीत आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना निवेदनही दिले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेला सुट्टी असतानाही अध्यक्षा महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.त्या म्हणाल्या, याबाबतीत केवळ गैरसमज झाला आहे. तोंडावर विधानसभा निवडणुका आहेत. सप्टेंबरमध्ये कधीही आचारसंहिता लागू शकते. तेव्हा समन्वयातून कामे व्हावीत यासाठी भाजप तालुकाध्यक्षांनीही कामे सुचवावीत. जेणेकरून सदस्य आणि पक्षीय पदाधिकारी यांनी सुचविलेली कामे दुबार होऊ नयेत या भूमिकेतून पालकमंत्री पाटील यांनी ही भूमिका मांडली होती. त्यामुळे कोणत्याही सदस्याच्या अधिकारावर गदा आणलेली नाही.यावेळी के. एस. चौगुले, हेमंत कोलेकर, विजया पाटील, राजवर्धन निंबाळकर, अमर पाटील, राजेश पाटील यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. या पत्रकार परिषदेला जनसुराज्यचे दोन सभापती विशांत महापुरे आणि सर्जेराव पाटील पेरीडकर यांच्यासह जनसुराज्यच्या अन्य आठ सदस्यांनाही बोलावण्यात आले होते.