शहरात शिवजयंतीच्या उत्सवाला बुधवारपासून सुरुवात झाली. त्यात शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकात विजयीभव छत्रपती शिवराय या संकल्पनेवरील भव्य प्रतिकृतीचे उद्घाटन झाले. मिरजकर तिकटी येथील मावळा संघटनेच्या ‘आग्राहून सुटका’ या नाटिकेचा प्रारंभ झाला. शिवाजी तरुण मंडळाने ३३ हजार रूद्राक्षांपासून साकारलेली शिवप्रतिमा खुली करण्यात आली. छत्रपती शिवाजी चौक, निवृत्ती चौकातील शिवरायांच्या पुतळा परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिवाजी पेठ, मंगळवार पेठसह शहरातील विविध ठिकाणी शिवप्रतिमा उभारण्यात आल्या आहेत. कॉलनी, गल्ली, अपार्टमेंटमधील मुलांनी भगवे झेंडे लावून, मंडप घालून शिवजयंतीची तयारी गुरुवारी सुरू केली. महाव्दार रोड, दसरा चौक, महापालिका चौक, पापाची तिकटी, रंकाळा टॉवर चौक, सीबीएस स्टँड, आदी परिसरात भगवे झेंडे, स्कार्फ, टी-शर्ट खरेदीची लगबग दिसून आली. सोशल मीडियावर शिवरायांसह गडकोटांची छायचित्रे, माहिती चित्रफितींनी शेअर करण्यात येत होती. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्यावतीने शुक्रवारी सकाळी दहा वाजता नर्सरी बागेतील शिवछत्रपतींच्या मंदिरात जन्मकाळ सोहळा होईल. छत्रपती शिवाजी चौकात शुक्रवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी जन्मकाळ सोहळा होणार आहे. अकरा वाजता हुतात्मा पार्कात छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार केला जाणार आहे. मंगळवार पेठेतील ऐतिहासिक कैलासगडची स्वारी मंदिरात तैलचित्र पूजनासह भजन, पाळणा आणि प्रसाद वाटप केला जाईल. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्यावतीने दुपारी बारा वाजता शिवजयंती साजरी केली जाईल. जनहित फौंडेशनतर्फे सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत अभ्यास वर्ग शिबिर घेण्यात येणार आहे. सानेगुरुजी वसाहतीमधील संयुक्त शिवजयंती उत्सव समिती बी. डी. कॉलनीच्यावतीने सकाळी साडेदहा वाजता शिवजयंती होईल.
चौकट
कोल्हापूरकरांची मोहीम
युथ मुव्हमेंट फौंडेशनच्यावतीने ‘कोल्हापूरकरांची मोहीम’ हा उपक्रम सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत छत्रपती शिवाजी चौकात राबविण्यात येणार आहे. त्यात पेन, वही, शालेय साहित्य, धान्य, खाद्यतेल देऊन सहभागी होता येईल.
फोटो (१८०२२०२१-कोल-शिवजयंती फोटो ०१ व ०२) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळा परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)