कोल्हापूर : सीपीआरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांव्यतिरिक्त जिल्ह्यातील अन्य रुग्णांसाठी ४०० म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांसाठी इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही इंजक्शन्स विकत उपलब्ध करून दिली जात असून त्यासाठी सीपीआरच्या पाठीमागील बाजूस असलेल्या औषध गोदाममध्ये नावे नोंदवून घेतली जात आहेत.
जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून म्युकरमायकासिसचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाले आहेत. त्यानंतर या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या लिपोसोमल एम्फोटिसिरिन बी या इंजेक्शन्सची मागणी वाढली आहे. एकतर ही इंजेक्शन्स महाग आहेत आणि ती एका रुग्णासाठी जादा संख्येने लागतात. त्यामुळे या सर्व इंजेक्शन्सची खरेदी शासनाकडून सुरू आहे.
शासकीय रुग्णालयांव्यतिरिक्त उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या सोयीसाठी येथील सीपीआरमधून ही इंजेक्शन्स पैसे घेऊन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. साडेचार हजार ते सहा हजार रुपयांपर्यंत या इंजेक्शन्सची किंमत आहे. आतापर्यंत शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी ३०० तर अन्य रुग्णांसाठी ४०० इंजेक्शन्स उपलब्ध करून दिली आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य औषध निर्माण अधिकारी डी. डी. जाधव यांनी दिली. ज्यांना ही इंजक्शन्स हवी आहेत त्यांच्याकडून आधी मागणी नोंदविण्यात येत असल्याने या इंजेक्शनसाठीही सकाळच्या टप्प्प्यात गर्दी होत असल्याचे चित्र आहे.