चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात आलेला एव्हीएच प्रकल्प अखेर स्थलांतरित करीत असल्याचे पत्र कंपनीने पुणे येथील विभागीय आयुक्तांना दिले आहे. त्यामुळे गेली चार वर्षे पर्यावरण व मानवी आरोग्यास घातक असल्याचे कारण पुढे करून जतनेने तीव्र आंदोलने केली होती. जनतेने केलेल्या आंदोलनाचा धसका घेऊन कंपनीने गाशा गुंडाळला आहे. सन २०१२ मध्ये एव्हीएच प्रकल्पाची हलकर्णी औद्योगिक वसाहतीत उभारणी करण्यात आली होती; पण पर्यावरण व मानवी आरोग्याला घातक असल्याने या प्रकल्पाला उभारणीपासूनच जनतेने विरोध केला. निवृत्ती न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील, माजी आमदार नरसिंगराव पाटील, डॉ. नंदा बाभूळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला होता. कंपनीची दोनवेळा केलेली जाळपोळ, वाहने जाळणे, कँडल मोर्चा, वारकरी दिंडी, शाळकरी विद्यार्थ्यांचा गांधीगिरीने काढलेला मोर्चा, जिल्हाधिकारी कार्यालयाची केलेली मोडतोड, आदी आंदोलनामुळे कंपनी सुरू होण्यास प्रचंड अडथळे निर्माण झाले. कंपनीला मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे अखेर कंपनीने एव्हीएच प्रकल्प (इप्सिलॉन कार्बन प्रा. लि) सध्याचे बदललेले नाव हलकर्णी येथून हलवून कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील सोंडुर तालुक्यातील मुशिनाथकनहळ्ळी या गावी हलविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रकल्पाची संपूर्ण यंत्रसामुग्री, कच्चा माल व इतर साहित्य हलविणार असल्याचे पत्र ११ जानेवारी २०१६ रोजी केंद्रीय सीमाशुल्क उपायुक्तांना दिले. तर १५ फेब्रुवारी २०१६ रोजी पुन्हा कंपनीने दुसरे पत्र पुणे येथील विभागीय आयुक्तांना दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, शासनाने आज जरी कंपनीला उत्पादन घेण्यास परवानगी दिली तरी कंपनी व्यवस्थापनाची या ठिकाणी उत्पादन घेण्याची मानसिकता नाही. तांत्रिक अडचणी व कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा प्रश्नही आहे. त्यामुळे आपण या ठिकाणाहून स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदूषणकारी एव्हीएच प्रकल्प जनरेट्यामुळे हद्दपार झाला. याचे श्रेय तालुक्यातील जनतेला आहे. या प्रकल्पाविरोधात जनआंदोलन कृती समितीने शासन, कंपनी, अधिकारी यांच्याविरोधात सातत्याने संघर्ष केला. त्याला आज यश आल्याचे जनआंदोलन कृती समितीच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी सांगितले. गडहिंग्लजला आनंदोत्सव गडहिंग्लज : चंदगड तालुक्यातील विनाशकारी ‘एव्हीएच’ प्रकल्प हद्दपार करण्यात डॉ. नंदिनी बाभूळकर यांना यश मिळाल्याबद्दल गडहिंग्लज तालुक्यातील कार्यकर्त्यांनी येथील दसरा चौकात साखर वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. जनआंदोलन कृती समितीच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून विविध प्रकारची आंदोलने, न्यायालयीन लढाई आणि तुरुंगवास पत्करून विनाशकारी प्रकल्प हद्दपार करण्यात यशस्वी झाल्याबद्दल डॉ. बाभूळकर यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बी. एन. पाटील - मुगळीकर, जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद तेली व जयकुमार मुन्नोळी, माजी सभापती अमर चव्हाण, सतीश पाटील, मोहन चव्हाण, आनंदा पाटील, राजू हसुरे, अभिजित पाटील, सहदेव कोकाटे, उमेश दंडगे, टी. एल. धुमाळ, आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘एव्हीएच’ने अखेर गाशा गुंडाळला
By admin | Published: February 24, 2016 1:06 AM