कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सवामध्ये अंबाबाई मंदिर परिसरात नागरिकांनी गर्दी न करता देवस्थान समितीने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन अथवा स्थानिक चॅनेलवरून थेट मंदिरातून प्रसारित होणाऱ्या देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले. नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या.
कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून यंदाचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मंडळांच्या देवीची मूर्ती २ ते ४ फुटाच्या मर्यादित असाव्यात. शक्यतो पारंपरिक देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे. शहर व मंदिर परिसरात स्वच्छता, साफसफाई, प्लास्टिक कचरा याबाबत आरोग्य विभागाने विशेष पथके नेमावीत, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या.मंदिर परिसरातील दुकानांचे फायर ऑडिटमंदिर परिसराला लागून असलेले रस्ते बंदिस्त करावेत. आग प्रतिबंधक उपाययोजनेसाठी मंदिर परिसराचे व बाहेरील दुकानांचे फायर ऑडिट करावे. मंदिर परिसरात अतिक्रमण होऊ नये याची दक्षता घ्या, अशा सूचना आयुक्त डॉ. बलकवडे यांनी दिल्या.मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवणारनवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्यावतीने ३ पथके २४ तास कार्यरत राहतील. देवस्थान समितीचे कर्मचारी व मंदिर परिसरातील दुकानदार यांना महापालिका आग प्रतिबंधक उपाययोजनेबाबत प्रशिक्षण देत आहे. मंदिर परिसरातील मुख्य चौक रिकामे करण्याचे काम सुरू आहे. या परिसरातील अतिक्रमण उठाव करण्यासाठी १० दिवस अतिक्रमण पथक तैनात करण्यात आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी सांगितले.