गांधीनगर : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारने केलेल्या लॉकडाऊनला गांधीनगर बाजारपेठेतील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून चांगला प्रतिसाद दिला आहे. या बाजारपेठेतील सुमारे साडेतीन ते चार हजार दुकाने बंद असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. गुरुवारपासून गांधीनगर बाजारपेठेसह परिसरातील गावांमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहिले. जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गांधीनगर व्यापारी पेठेतील कापड मार्केट, इलेक्ट्रॉनिक, हँडलूम, होजिअरी, रेडिमेड गारमेंट अशी सुमारे साडेतीन ते चार हजार दुकाने बंद आहेत. तसेच अत्यावश्यक ट्रान्स्पोर्ट वाहतूक वगळता सर्व मार्केट बंद राहिले. विनाकारण रस्त्यावरून संचार करणाऱ्या तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर गांधीनगर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. गांधीनगर पोलिसांकडून जनजागृती करण्यासाठी वाहनातून संचारबंदी आदेशाचे पालन करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.
फोटो : १५ गांधीनगर बाजारपेठ
ओळ- संचारबंदी काळात गांधीनगर मुख्य रस्त्यावर असा शुकशुकाट होता. (फोटो - बाबासाहेब नेर्ले.)