कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ वारंवार अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यात विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांना किरकोळ ते गंभीर स्वरूपाचा शारीरिक, मानसिक, आर्थिक आघात सहन करावा लागत आहे. हे अपघात टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कोल्हापूर शहर (जिल्हा) युवक काॅंग्रेसने सोमवारी केली.
विद्यापीठाचे प्रवेशव्दार रस्त्यापासून किमान ४० ते ५० फूट आत असावे. या प्रवेशव्दाराची उंची आणि लांबी वाढविण्यात यावी. विद्यापीठाची भव्यता लक्षात घेता, त्याला साजेशे असे भव्य प्रवेशव्दार असावे. या मागण्यांचा विचार करून पुढील कार्यवाही करण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी. त्यामध्ये संबंधित विषयातील तज्ज्ञांचा समावेश असावा. सुरक्षित विद्यापीठ कॅॅम्पसच्या दृष्टिकोनातून आम्ही केलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून कार्यवाही करावी, असे निवेदन कोल्हापूर शहर युवक काॅंग्रेसचे प्रवक्ता अभिषेक मिठारी, सुदर्शन तुळसे, प्रथमेश पाटील आणि महेश सुतार यांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना दिले आहे.