लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : प्रभाग क्रमांक १० मध्ये विद्युत खांब व एलईडी बल्ब बसविण्याचे काम मंजूर आहे. दीड वर्षापूर्वी ठेकेदारास काम दिले आहे. परंतु, वारंवार पाठपुरावा करूनही या कामास अद्याप सुरुवात झाली नाही. याविरोधात नगरसेवक राजू बोंद्रे यांच्यासह भागातील नागरिकांनी नगरपालिकेच्या विद्युत विभागास टाळे ठोकून आंदोलन केले. त्या विभागातील सात ते आठ कर्मचाऱ्यांना काही वेळ डांबून ठेवले. आठ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले.
प्रभाग क्रमांक १० मध्ये विद्युत खांब व त्यावर एलईडी बल्ब बसविण्यासाठी चार लाखांचे अंदाजपत्रक तयार करून ते मंजूर झाले. त्याप्रमाणे ठेकेदारास दीड वर्षांपूर्वी काम दिले. त्यानंतर वेळोवेळी या कामासाठी नगरपालिकेत पाठपुरावा केला. तरीही काम होत नसल्याने नगरसेवक बोंद्रे यांनी टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर संतप्त नागरिकांना घेऊन बोंद्रे यांनी बुधवारी टाळे ठोको आंदोलन केले.
त्यावर उपमुख्याधिकारी केतन गुजर यांनी, नियमानुसार ठेकेदार व जामीनदारास नोटीस बजावणार असल्याचे सांगितले. आठ दिवसांनंतर काम सुरू न झाल्यास पुन्हा उग्र आंदोलन करू, असा इशारा बोंद्रे यांनी दिला. आंदोलनात भरत पोवार, दस्तगीर सनदी, राहुल घोरपडे, संतोष काटकर, इरफान मकानदार, आदी सहभागी झाले होते.
फोटो ओळी
०३०३२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजीत प्रभाग क्रमांक १० येथे विद्युत विभागातील कामे न झाल्याच्या निषेधार्थ नगरसेवक राजू बोंद्रे यांच्यासह नागरिकांनी टाळे ठोको आंदोलन केले.
छाया : उत्तम पाटील