कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वीज बिलमाफीसाठी वारंवार निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने मंगळवारी सर्वपक्षीय कृती समितीने महावितरणच्या मुख्य कार्यालयाला टाळे ठोकत सर्व व्यवहार बंद पाडून हिसका दाखवला. कर्मचाऱ्यांना आत सोडण्यावरून आंंदोलकांची पोलीसांबरोबर झटापटही झाली. पोलिसांकडून अटकसत्र सुरू झाल्यानंतरही तब्बल चार तास मुख्य कार्यालयासमोर ठिय्या मारत वीज बिल माफी झालीच पाहिजे या घोषणेने परिसर डोक्यावर घेतला.लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिले असल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. सर्वपक्षीय कृती समिती, राज्य इरिगेशन फेडरेशन,यांनी मंगळवारी महावितरणच्या जिल्ह्यासह राज्यातील सर्व कार्यालयांना टाळे ठोकणार असल्याचा इशारा १३ जुलैला झालेल्या आंदोलनावेळी दिला होता; पण शासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर संताप अनावर झालेल्या जनतेने महावितरणलाच टाळे ठोकून चार तासांहून अधिक काळ सर्व व्यवहार बंद पाडले.
आंदोलकांत रोष इतका होता की महावितरणचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांना स्वत: रस्त्यावर येत ठिय्या मारलेल्या आंदोलकांसमोर येऊन निवेदन स्वीकारावे लागले. हा राज्याच्या धोरणात्मक पातळीवरील निर्णय आहे, तरीदेखील वीज बिल भरले नाही म्हणून घरगुती, शेतीचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही दिली.दुपारी अकरा वाजता आंदोलन सुरू होणार होते, पण कर्मचारी आत गेले तर आंदोलनाची तीव्रता कळणार नाही म्हणून आंदोलकांनी सकाळी नऊ वाजता ताराबाई पार्कातील महावितरणचे कार्यालय गाठले आणि मुख्य गेटलाच कुलूप लावले. दुपारी आंदोलन होणार म्हणून पोलीसही गाफिल राहिले. दहा वाजता कर्मचारी येऊ लागले तसा गोंधळ वाढला.
पोलिसांनी धाव घेत कुलूप काढण्याचा प्रयत्न केला, यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. अटक सत्र सुरू केल्यानंतर तर आंदोलक आधिकच आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांच्या वाहनांसमोरच ठिय्या मारला. कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन बाहेरच थांबविण्यात आले. चार तास हे कर्मचारी बाहेरच ताटकळतच राहिल्याने कार्यालयीन कामाचा पुरता बोजवारा उडाला.आंदोलनात मारुती पाटील, बाबासोा देवकर, बाबा पार्टे, भारत पाटील, चंद्रकांत पाटील, आर. के. पाटील, जयकुमार शिंदे, चंद्रकांत यादव, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, आर. जी. तांबे, राजेंद्र पाटील, विशांत महापुरे, संदीप देसाई, सुभाष देसाई, संभाजीराज जगदाळे, सुभाष जाधव, अशोक पोवार, रमेश मोरे, सुभाष पाटील यांनी सहभाग घेतला.