कोल्हापूर : गेल्या महापालिकेपासून आताच्या विधानसभेपर्यंत काही चुका झाल्या आहेत. तेव्हा त्या चुका टाळून खचून न जाता आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार राहा, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केल्या.राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचामुळे गेले २0/२२ दिवस पाटील मुंबईतच होते. त्यांना भेटण्याची कार्यकर्त्यांची इच्छा होती; त्यामुळे त्यांनी बुधवारी भाजपच्या जिल्हा कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनीही आपल्या भावना मोकळेपणाने मांडल्या.
पाटील म्हणाले, की गेल्या महापालिकेवेळी चुका झाल्या आहेत. अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. आता असे होणार नाही. पक्षासाठी काम केलेल्या कार्यकर्त्यांनाच संधी मिळेल. त्या दृष्टीने आता सर्वांनीच तयारीला लागावे. सध्या पक्षाच्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम सुरू आहे. त्याचाही आढावा यावेळी पाटील यांनी घेतला.
यावेळी महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विजय जाधव, गणेश देसाई, अॅड. संपतराव पवार, आर. डी. पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. बुधवारी आणि गुरुवारी दोन्ही दिवस पाटील यांनी कोणताही जाहीर कार्यक्रम न घेता अनेकांच्या घरी सांत्वनपर आणि सदिच्छापर भेटी दिल्या.सरकार आमचेचयावेळी राज्यात सत्ता कुणाची येणार याबाबत कार्यकर्त्यांनी पाटील यांच्याकडे विचारणा केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत भाजपचीच सत्ता येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आणि कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.