इचलकरंजी : शहरातील भुयारी गटारीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाकडील मक्तेदाराचे २५ लाख रुपयांचे देयके थकीत असल्याने गेली आठ महिने मक्तेदाराकडील कंत्राटी कामगारांचा पगार झालेला नाही. पगाराच्या मागणीसाठी प्रकल्पाकडील कामगारांनी प्रवेशद्वाराला टाळे ठोकून काम बंद आंदोलन केले.आसरानगरजवळील सांडपाणी प्रक्रिया करणारा (एसटीपी) हा प्रकल्प चालविण्याचे काम मुंबई येथील ओम इंडस्ट्रिज कंपनीला दिले आहे. प्रकल्पाकडे वारंवार देण्यात आलेली २५ लाख रुपयांची देयके मक्तेदाराला मिळाली नाहीत. त्यामुळे प्रकल्पाकडे काम करणाऱ्या चौदा कामगारांना मक्तेदाराने वेतन दिले नसल्यामुळे आठ महिन्यांचे वेतन थकीत आहे. नगरपालिकेने वेतन द्यावे, या मागणीसाठी कंत्राटी कामगारांनी प्रकल्पाला टाळे ठोकले आणि त्याबाबतची कैफियत नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्याकडे मांडली. या देयकाबाबत नगराध्यक्षांनी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडे संपर्क साधला आहे. याबाबत योग्य ती उपाययोजना लवकर करू, असे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)असा आहे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पशहरातील भुयारी गटार योजनेकडील सांडपाणी आसरानगरजवळील असलेल्या सांडपाणी प्रक्रिया करणाऱ्या (एसटीपी) प्रकल्पामध्ये एकत्रित करण्यात आले आहे. त्या प्रकल्पावर प्रक्रिया करून त्यातून शुद्ध झालेले पाणी पुढे शेतीला दिले जाते. तसेच या प्रकल्पांतर्गत टाकवडे वेस येथे पाण्याचे विहिरीत एकत्रीकरण करून ते पाणी एसटीपी प्रकल्पाकडे नेण्यात येते.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला टाळे
By admin | Published: September 30, 2016 12:45 AM