कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नेमण्याचा कायदा झाला असला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या वतीने रविवारी बैठकीत करण्यात आला.अंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नेमण्यासाठी राज्य सरकारने कायदा केला. मात्र, कायदा होऊन काही महिने लोटले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी रविवारी समितीच्या सदस्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची भेट घेतली. याप्रसंगी पालकमंत्र्यांची वेळ घेऊन लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन जाधव यांनी आंदोलकांना दिले.यावेळी आर. के. पोवार म्हणाले, जनतेच्या रेट्यामुळे सरकारने ‘अंबाबाई मंदिर पगारी पुजारी कायदा’ केला. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. या कायद्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे.संजय पवार म्हणाले, कायदा झाला; पण काळानुसार त्याची अंमलबजावणी झालीच नाही. पुन्हा नवरात्रौत्सव आला आहे. त्यामुळे पुजाऱ्यांना पुन्हा उत्पन्नाची संधीच मिळाली आहे. नवरात्रौत्सवापूर्वी हा कायदा लागू करता येतो का, हे समितीने पाहणे आवश्यक आहे.महेश जाधव म्हणाले, तात्पुरते पुजारी नेमण्याची प्रक्रिया सुरू केली होती; पण काहीजण न्यायालयात गेल्याने ती थांबली. नवरात्र तोंडावर असून एवढ्या कमी वेळात सर्व धार्मिक विधी करू शकतील असे पुजारी नेमणे अशक्य आहे. मात्र, शासकीय पुजारी नेमावेत, हीच आमची भूमिका आहे.या बैठकीला इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी आमदार सुरेश साळोखे, दिलीप पाटील, अॅड. चारूलता चव्हाण, बाबा पार्टे, शरद तांबट, प्रताप वरुटे हे उपस्थित होते.
पुजारी नेमणूक कायदा अंमलबजावणीस टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:51 AM