कोल्हापूर : जिल्ह्यातील विधानपरिषदेची काँग्रेसची उमेदवारी आपणालाच मिळेल, असे शेवटपर्यंत वाटत होते; पण काँग्रेस श्रेष्ठींनी सतेज पाटील यांना उमेदवारी दिल्याने आपण माघार घेतली. आता पाटील यांच्या विजयासाठी झोकून देऊन काम करणार असल्याची ग्वाही, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांनी माघार घेतल्याने सतेज पाटील यांची लढत सोपी झाली असून काँग्रेसअंतर्गत राजकारणातील बदलाचे संकेत त्यातून मिळत आहेत. विधानपरिषदेसाठी बुधवारी प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी दाखल करत सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस श्रेष्ठींना धक्का दिला होता. आवाडे यांची बंडखोरी अथवा नाराजी काँग्रेस उमेदवाराला अडचणीची ठरू शकते. त्यामुळेच गेले दोन दिवस सतेज पाटील यांनी प्रकाश आवाडे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले होते. शुक्रवारी सकाळी आमदार महादेवराव महाडिक यांनी प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन तुम्ही रिंगणात राहा, आपण माघार घेतो, असा प्रस्ताव ठेवल्याने सतेज पाटील यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या. त्यानंतर प्रदेश पातळीवरून हालचाली गतिमान झाल्या आणि सतेज पाटील यांनी थेट हुपरी गाठली. जवाहर साखर कारखान्यावर या दोन नेत्यांत दीड तास चर्चा रंगली. त्यानंतर सतेज पाटील व प्रकाश आवाडे एकाच गाडीतून दुपारी सव्वा दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आले. आवाडे यांनी माघारीचा अर्ज जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे दिला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आवाडे म्हणाले, काँग्रेसची उमेदवारी आपणाला मिळेल असे वाटत होते, त्यामुळेच उमेदवारी अर्ज दाखल केला होता; पण पक्षाने सतेज पाटील यांना उमेदवारी दिली, याबाबत शुक्रवारी इचलकरंजी काँग्रेस कमिटीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये सतेज पाटील यांच्या मागे ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना निवडून आणण्यासाठी माझे नगरसेवक व सहकारी संस्थांचे पदाधिकारी ताकदीने निवडणुकीत उतरतील. यावेळी डॉ. संजय डी. पाटील, राहूल आवाडे, अशोक सौंदत्तीकर, प्रकाश सातपुते, प्रल्हाद चव्हाण आदी उपस्थित होते. ( प्रतिनिधी )प्रदेशाध्यक्षांशी आवाडेंची चर्चाप्रकाश आवाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी त्यांचे फोनवरून बोलणे करून दिले. त्यांनी सकाळीच आपल्याकडे आमदार महादेवराव महाडिक आले होते. तुम्ही उभे राहत असाल तर माघार घेण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता; पण आपण काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याने माघार घेतल्याचे आवाडे यांनी फोनवरून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना सांगितले.
आवाडेंची माघार, सतेज यांना पाठिंबा
By admin | Published: December 12, 2015 12:55 AM