जयसिंगपूर : ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्रासोबत जोडाव्या लागणाऱ्या कागदावरून उमेदवारांचा गोंधळ सुरू आहे. ही कागदपत्रे गोळा करताना त्यांची दमछाक होत आहे. सुरुवातीला शपथपत्र, स्वयंम घोषणापत्र, हमीपत्रावरून चांगलाच गोंधळ उडाला होता. मात्र, ही कागदपत्रे साध्या कागदावर देण्याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनेकांचा गोंधळ थांबला असला तरी सर्व्हर डाऊनमुळे उमेदवार रात्री जागरण करून नोंदणी करत आहेत.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, गावागावांत राजकीय वातावरण तापले आहे. नामनिर्देशनपत्र भरण्याची लगबग चालू झाली आहे. नामनिर्देशन पत्र ऑनलाईन नोंदणी करताना सर्व्हर डाऊन होत असल्याने संगणकासमोर ताटकळत बसावे लागत आहे. दिवसा सर्व्हर डाऊन झाल्याने रात्री जागरण करावे लागत आहे. ऑनलाईनमुळे उमेदवार मेटाकुटीला आले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असल्याने इच्छुक उमेदवारांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
चौकट -
उमेदवारांची ओढाताण
काही गावांमध्ये अद्यापही उमेदवारांची ओढाताण सुरू आहे. गावपुढाऱ्यांकडून योग्य उमेदवारांचा शोध घेतला जात आहे, तर काहीजणांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे गावपुढाऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढणार आहे. नेत्यांकडून अनेकांना शब्द दिला जात असल्यामुळे ऐनवेळीला बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फोटो - २७१२२०२०-जेएवाय-०१
फोटो ओळ - शिरोळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा ऑनलाईन फॉर्म भरताना सर्व्हर डाऊनमुळे ताटकळत बसावे लागत आहे.