कोल्हापूर : अमेरिकेतील मराठी माणसांच्या महाराष्ट्र फाउंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी कोल्हापूरातीलसाहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे.महाराष्ट्र फाउंडेशनमार्फत दरवर्षी साहित्य आणि समाजकार्य क्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. २0१९ या वर्षासाठी साहित्य प्रकारातील पुरस्कारासाठी प्रा. कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीचा विचार करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण १२ जानेवारी २0२0 रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी ५ ते ८ या वेळेत माहिती हक्क कार्यकर्त्या अरुणा रॉय यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभास महाराष्ट्र फाऊंडेशनचे अध्यक्ष अंकुश कर्णिक, पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख उपस्थित राहणार आहेत.
रिंगाण विस्थापितांच्या जगण्याची कहाणीरिंगाण या कृष्णात खोत यांच्या कादंबरीत विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण आलेले आहे. देवाप्पाच्या पाळीव म्हशी रानटी होतात, त्यांच्या मूळपदावर जातात आणि त्यातून त्यांचा नि देवप्पाचा संघर्ष उभा राहतो. कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात. नवद्दोत्तरी काळातील मराठी साहित्याला वेगळी दिशा देणारे लेखक म्हणून प्रा. खोत यांची ओळख आहे.
गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांच्या गावठाण, रौंदाळा, झडझिंबड आणि धूळमाती या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय नांगरल्याविन भुई हे ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. त्यांना राज्यशासनासह अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत.
महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळणे हे आनंददायी आहे. यानिमित्ताने विस्थापितांच्या जगण्याचा विषयाकडे कांही लोकांचे लक्ष वेधले जाईल. केवळ धरणग्रस्तच नव्हे तर माणूसच विस्थापित झाला आहे. यानिमित्ताने माझ्या लेखनाचा सन्मान झाला आहे, असे मी मानतो. महाराष्ट्र फाउंडेशनची ही चांगली परंपरा आहे. अनेक मान्यवरांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यात माझा समावेश केल्याबद्दल मला आनंदच वाटतो.प्रा. कृष्णात खोत, साह्त्यििक, कोल्हापूर.