कोल्हापूर: शासनाकडून सातत्याने आवाहन करुन देखील नसबंदी शस्त्रक्रियेसाठी पुरुषांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने, कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक पोलादे यांनी भर चौकात थेट होर्डिंगच लावले आहे. गजबजलेल्या शाहू मिल चौकात त्यांनी स्वखर्चाने हे होर्डिंग लावून लोकसंख्या नियंत्रणासाठी यात सहभागाचे कळकळीचे आवाहन केले आहे.
या होर्डिंगच्या माध्यमातून पुरुषांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ही नसबंदी शस्त्रक्रिया अगदी सोपी, निर्धोक पध्दतीची असून केवळ पाच-दहा मिनिटांत पूर्ण होते. रक्तस्राव, जखम, सूज वगैरे त्रास यात जवळजवळ नसतो. ही शस्त्रक्रिया सोपी असून वैवाहिक जीवन पहिल्यासारखेच आनंदी राहते. या शस्त्रक्रियेबाबत समाजात अकारण भीती व गैरसमज आहेत. ही शस्त्रक्रिया बिनटाक्याची असते. म्हणजेच टाका काढण्यासाठी परत डॉक्टरकडे जावे लागत नाही, असे या होर्डिंगवर लिहिण्यात आले आहे. या शस्त्रक्रियेसाठी इच्छुकांनी नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. पोलादे यांनी एक कलश रक्षा, तिरडी दान, शेणीदान असे उपक्रम राबविले आहेत.
फोटो : २५१२२०२०-कोल-नसबंदी
फोटो ओळ:
कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक पोलादे यांनी नसबंदी शस्त्रक्रियेविषयी पुरुषांचे प्रबोधन करण्यासाठी स्वखर्चाने शाहू मिल चौकात होर्डिंग लावले आहे.