सुनील चौगले
आमजाई व्हरवडे : गोकूळच्या सत्तेसाठी जिल्ह्यात जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत. गोकूळच्या सत्तेवर आपल्या नातेवाइकांना बसविण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत; मात्र गोकूळच्या या रणांगणात उमेदवारीची संधी असतानाही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांला संधी देऊन दिलदारपणा दाखवला आहे.
ए. वाय. पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करत राधानगरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला केलाच शिवाय राष्ट्रवादी भक्कम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. २०१४ व २०१९ ला त्यांच्या कार्यकर्त्यांना विधानसभा खुणवू लागली. त्या दृष्टीने त्यांनी तयारीही केली होती. २०१९ संधी असतानाही शरद पवार व हसन मुश्रीफ यांचा शब्द प्रमाण मानत कार्यकर्त्यांची समजूत काढत पक्षासाठी काम करण्याचे आदेश दिले.
शरद पवार यांनी तर मुदाळ तिट्टा येथील जाहीर जभेत ए. वाय. यांचा त्याग कधीही वाया जाऊन देणार नाही असे सांगून सत्तेवर येताच ए. वाय. यांचे नाव पहिल्या यादीत वाचायला मिळेल, असे सांगितले होते; पण नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करण्याची पद्धत असल्याने पदाची चिंता न करता पक्षासाठी अहोरात्र राबत आहेत.
गोकूळसाठी हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी सत्तारूढ आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. विरोधी आघाडीकडून ए. वाय. पाटील यांना एक जागा निश्चित आहे. स्वत: किंवा पत्नीला ते सहज उमेदवारी घेऊ शकले असते. पॅनेल मजबुतीसाठी नेत्यांचाही ए. वाय. यांच्यावर उमेदवारीसाठी दबाव होता; पण सामान्य कार्यकर्त्यांना कायमच पाठबळ देणाऱ्या पाटील यांनी सामान्य कार्यकर्ता असणारे प्रा. किसन चौगले यांना उमेदवारी देऊन सर्वांनाच धक्का दिला आहे.