सुनील चौगले
आमजाई व्हरवडे : गेल्या पंचवीस वर्षांपासून राधानगरी तालुक्यात एकखांबी नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचेच वर्चस्व राहिल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. १९ पैकी ८ ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांची एकतर्फी सत्ता आली आहे, तर सात ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आघाड्याबरोबर केलेल्या आघाड्यांनी सत्ता आणल्या आहेत.
नरतवडे, म्हासुर्ली, कोणोली, गवशी, हेळेवाडी, राजापूर, कोदवडे, पनोरी या आठ गावांत ए. वाय. समर्थक सत्तेत आले, तर गुडाळ, खिंडी, व्हरवडे, तळाशी, बुजवडे, हेळेवाडी या ठिकाणी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलेल्या स्थानिक आघाड्यांना यश आले.
राधानगरी तालुक्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून राधानगरी तालुक्यात ए. वाय. पाटील यांचे एकखांबी नेतृत्व आहे. १५९ सदस्यांपैकी १०२ सदस्य ए. वाय. पाटील यांचे नेतृत्व मानणारे आहेत. त्यामुळे राधानगरी तालुक्याच्या राजकारणात गेल्या वीस वर्षांपासून असणारा दबदबा आजही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.