कोल्हापूर : अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल सर्वोच्च न्यायालय १२ ते १७ नोव्हेंबरदरम्यान देणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताची जय्यत तयारी केली असून, समाजात सलोखा राहण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ बनविला आहे.
‘वज्र’ पोलीस व्हॅनसह सशस्त्र पोलिसांचा फौजफाटा, शीघ्र कृती दल, बॉम्बशोध पथक, सायबर क्राइम, दंगल काबू पथकांसह अन्य विभागांतील पथकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वतयारी म्हणून पोलीस मैदानावर प्रात्यक्षिक सरावाची जोरदार तयारी सुरू आहे.अयोध्येतील निकालाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर, इचलकरंजी, आजरा परिसरांत पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असून सोशल मीडियावर विशेष लक्ष आहे.
या निकालानंतर कोणत्याही समाजाच्या नागरिकांनी जल्लोष करू नये, कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असे व्हिडीओ क्लिप, फोटो, संदेश सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत. आक्षेपार्ह संदेश, व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांवर भादंवि कलम १८८ नुसार आणि सायबर अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.या कलमानुसार होणार कारवाईभारतीय दंडसंहिता कलम १८८/२९५/२९८- कोणत्याही वर्गाचा, धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे. बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे, धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उचारणे यासंबंधी दखलपात्र गुन्हे दाखल करून तत्काळ अटकसत्र आणि न्यायालयात हजर करणे.हे करू नये
- जमाव करून थांबू नये.
- सोशल मीडियावर संदेश प्रसारित करू नये.
- निकालानंतर गुलाल उधळू नये, फटाके वाजवू नयेत.
- महाआरती अथवा समूहपठण यांचे आयोजन करू नये.
- साखर, पेढे, मिठाई वाटू नये.
- घोषणाबाजी, जल्लोष करू नये.
- मिरवणुका, रॅली काढू नये.
- भाषणबाजी करू नये.
रामजन्मभूमी व बाबरी मशीद या संवेदनशील विषयावर सर्वोच्च न्यायालयाकडून काही दिवसांत निकाल अपेक्षित आहे. हा निकाल देणारी यंत्रणा ही देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था आहे. तिच्यावर भारतीय जनतेचा विश्वास आहे. त्या निकालाचा आदर करून नागरिकांनी शांतता राखावी.- डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर