अनंत जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
सावंतवाडी : केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्यावतीने उभारण्यात येत असलेला आयुर्वेद प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आडाळी येथेच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प लातूरला होणार की, सिंधुदुर्गात यावरून महाविकास आघाडीतच रणकंदन माजले होते. मात्र, यात सिंधुदुर्गने बाजी मारली आहे.
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्यावतीने तत्कालिन भाजप सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आडाळी येथील ५० एकर जागेत आयुर्वेदिक प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले होते. केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारशी पत्रव्यवहार करून जागाही निश्चित केली होती. मात्र, नंतर भाजप सरकार गेले आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यानंतर आडाळीतील जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
दरम्यान, आडाळी येथे आयुर्वेद प्रकल्प होणार असून, त्या प्रकल्पाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी सही केली असल्याचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मंत्री अमित देशमुख यांचे एक पाऊल मागे
त्यातच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांंनी हा प्रकल्प लातूर येथे हलविण्याचा घाट घातला होता. त्याला भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांनी विरोधही केला. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी तर मंत्री देशमुख यांच्यावर टीका करत प्रकल्प पळवत असल्याचा आरोप केला होता. यामध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मध्यस्थी केली. तसेच मंत्री देशमुख यांनीही एक पाऊल मागे घेतले.