कोडोली : आयुर्वेद या प्राचीन विज्ञानाचा समाजाला अधिकाधिक उपयोग व्हावा, यासाठी आयुर्वेद शास्त्राची प्रगती साधण्यासाठी कार्यशाळा व परिसंवाद महत्त्वाची भूमिका पार पाडतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. काशीनाथ गर्कळ यांनी केले. याप्रसंगी त्यांनी आयुर्वेद क्षेत्रात यशवंत आयुर्वेद महाविद्यालयाने आयुर्वेद शास्त्राचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याबाबत तसेच कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल गौरवोद्गार काढले.कोडोली (ता. पन्हाळा) येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. ५) राष्ट्रीय स्तरावरील रस चिकित्सा कार्यशाळा व परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यांच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गर्कळ बोलत होते. माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत देशभरातील सुमारे एक हजार डॉक्टरांनी सहभाग नोंदविला होता.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद गोडबोले यांनी स्वागत करून प्रास्ताविकात म्हणाले, आम्ही विद्यार्थ्यांवर सोपविलेली आरोग्य सेवेची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे पार पाडल्यामुळे समाजाला चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या. संस्थेचे व्यवस्थापक कै. प्रदीप पाटील यांची प्रेरणा व मार्गदर्शनामुळे महाविद्यालयाची अतुलनीय प्रगती झाली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार यशवंत पाटील म्हणाले, आम्ही संस्थेची प्रसिद्धी कधीच केली नसून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेमुळे महाविद्यालय सर्व क्षेत्रांत प्रगतीवर आहे. विद्यार्थ्यांनी व या क्षेत्रातील डॉक्टरांनी संशोधनातून दर्जेदार औषधांची व उपचारांची पद्धत विकसित करून उत्कृ ष्ट आरोग्य सेवा निर्माण करावी.या कार्यशाळेत महाविद्यालयाच्या रसशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी रसपुष्प, सुवर्णराज वंगेश्वर, ताम्रगर्भ, पोटटली या पारदापासून बनविलेली औषधे प्रदर्शनात ठेवण्यात आली होते. या प्रदर्शनात विविध रसकल्प व पारदापासून बनविलेले शिवलिंग हे प्रमुख आकर्षण ठरले. यावेळी शंभराहून अधिक रसकल्पाची मांडणीही करण्यात आली होती. यावेळी प्रकाशित करण्यात आलेल्या पाच उत्कृष्ट संशोधनात्मक प्रबंधांना रोख रक्कम, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. आयुर्वेद क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉ. विलास डोळे (पुणे) व डॉ. मोहन तांबे (सातारा) यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे व्यवस्थापक डॉ. जयंत पाटील व रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित इंगवले यांच्या विशेष प्रयत्नामुळे ही कार्यशाळा यशस्वी पार पडली.याप्रसंगी डॉ. सुनील इनामदार, डॉ. दिलखुश तांबोळी, माजी प्राचार्या डॉ. के. के. चौधरी, डॉ. शाम सुंगारे, डॉ. विलास जगताप, डॉ. विनोद पाटील, डॉ. प्रवीण पेठे. डॉ. जोस्ना टाकळीकर, डॉ. सत्वशील देसाई, फायटो फार्मा कंपनीचे दिलीप गुणे, डॉ. श्रेयस जोशी यांच्यासह मान्यवर डॉक्टर, संस्थेचे सचिव व्ही. डी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वर्षा खोत, डॉ. स्वाती पाटील, डॉ. यू. के. बंडे यांनी केले.
आयुर्वेदशास्त्राचा समाजाला उपयोग व्हावा
By admin | Published: February 06, 2016 12:21 AM