कोल्हापूर : पांढरी वगळता अन्य सर्व शिधापत्रिकाधारकांना वर्षाला ५ लाख रुपयांचे मोफत आरोग्य उपचार देणारे आयुष्मान भारत, गोल्डन कार्ड काढण्यात देशभरामध्ये कोल्हापूर ग्रामीण जिल्हा पहिला आला आहे. आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ९२ टक्के लाभार्थ्यांचे हे कार्ड काढण्यात आले असून कागल, भुदरगड आणि चंदगड तालुक्यांनी १०० टक्के कार्ड काढले असून हे तीन तालुके राज्यात पहिले आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.राज्य शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना यातून अनुक्रमे दीड आणि साडे तीन लाख असे एकूण पाच लाख रुपये वर्षाला एका कुटुंबाला वैद्यकीय उपचारासाठी मंजूर करण्यात आले आहेत; परंतु त्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे गोल्डन कार्ड त्यासाठी आवश्यक ठरते. हे कार्ड काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने गेल्या तीन महिन्यांत अहोरात्र मेहनत घेतली असून त्यामुळेच देशभरात ग्रामीण जिल्हा पहिला आहे. हे कार्ड असणाऱ्या रुग्णावर जिल्ह्यातील ९ शासकीय आणि ५६ खासगी अशा ६५ रुग्णालयांमध्ये १२०९ आजारांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.
सुरुवातीच्या काळात कर्मचाऱ्यांनी हे कार्ड काढण्यासाठी विरोध दर्शवला होता; परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा पाठपुरावा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी या कर्मचाऱ्यांचे योग्य समुपदेशन केल्यामुळे आशा, आरोग्य कर्मचाऱ्यांनी शर्थीने प्रयत्न करून लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर कार्ड काढले आहेत, असे डॉ. गायकवाड म्हणाले.
रात्रीची शिबिरे ठरली उपयुक्तदिवसभर आशा आणि आरोग्य कर्मचारी काम करून पुन्हा रात्री ही कार्डे काढण्यासाठी रात्रीची शिबिरे घेत होते. रात्री नेट कनेक्टिव्हिटी चांगली मिळत असल्याने मोबाइलवरून कामही वेगाने होत होते. गगनबावडा तालुक्यातील काही वाड्यावस्त्यांवर रेंज नसल्याने त्यांना आरोग्य विभागाच्या गाडीतून रेंज असणाऱ्या ठिकाणी आणून त्या ठिकाणी या योजनेसाठी नोंदणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने झोकून दिल्यानेच हे काम पूर्ण होऊ शकले.
तीन लाख लाभार्थ्यांसाठी करावे लागणार कामशिधापत्रिकाधारक पात्र लाभार्थ्यांची संख्या जरी १७,९०,७४६ असली तरी यातील ७४,५७२ मयत आहेत. १ लाख ८९ हजार ९९ कायमस्वरूपी किंवा विवाहामुळे परगावी गेल्याची नोंद आहे. ६६,०४७ जणांना हे कार्ड काढायचेच नाही. हे आकडे वजा जाता १४,६१,०२८ निव्वळ पात्र लाभार्थी ठरतात. यातील १३,३७,११३ जणांचे कार्ड काढण्यात आले आहेत. ग्रामीण कोल्हापूर जिल्ह्याचे हे काम ९२ टक्के झाले आहेत, तर ५२,२१२ जणांचे आधार कार्ड अपडेट नसल्याने त्यांचे कार्ड प्रलंबित आहेत. अशा उर्वरित तीन लाख जणांवर आता आरोग्य विभागाला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
गोल्डन कार्डचे तालुकावार झालेले कामतालुका - झालेले काम टक्केवारीभुदरगड १००चंदगड १००कागल १००आजरा ९९.९७शिरोळ ९८.९५गगनबावडा ९७.०४हातकणंगले ९६.७७गडहिंग्लज ९५.७४शाहूवाडी ९०.५०राधानगरी ८२.६९करवीर ८२.४०पन्हाळा ७८.३३