सांगली : जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायती, दहा पंचायत समित्या व जिल्हा परिषदेला कमी क्षमतेच्या युपीएस बॅटऱ्यांचा पुरवठा करून शासनास सुमारे ७० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी पुरवठादार ‘ए-झेड’ इलेक्ट्रॉनिक्स कंपनीविरुद्ध आज, गुरुवारी रात्री विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात फसवणुकीचे हे प्रकरण उघडकीस आले होते. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी कंपनीवर फौजदारी करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.ए-झेड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या पुरवठादारास जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या तसेच जिल्हा परिषदेला युपीएस बॅटऱ्या पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. १६०० व्हीएएच (व्होल्ट एम्पियर हावर्स) क्षमतेच्या युपीएस बॅटऱ्यांचा पुरवठा करण्यासाठी प्रति युपीएस बॅटरीसाठी २४ हजार रुपयांची निविदा मंजूर होती. या किमतीनुसार ७१५ युपीएस बॅटरीची किंमत १ कोटी ७१ लाख ६० हजार रुपये होते. प्रत्यक्षात संबंधित कंपनीकडून १६०० ‘व्हीएएच’ क्षमतेऐवजी १२०० ‘व्हीएएच’ क्षमतेच्या बॅटऱ्यांचा पुरवठा झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. जवळपास ४०० क्षमता कमी असलेल्या युपीएस बॅटऱ्यांचा कमी पुरवठा झाला आहे. युपीएस बॅटऱ्यांच्या पुरवठ्यात ७० लाखांचा घोटाळा केल्याचा अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.गेल्या आठवड्यात हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सभेत यावर जोरदार चर्चा झाली होती. याप्रकरणी ‘ए-झेड’ इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या पुरवठादारावर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश लोखंडे यांनी दिले होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांनी गुरुवारी रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल केली. (प्रतिनिधी)
‘ए-झेड’ कंपनीविरुद्ध अखेर गुन्हा
By admin | Published: February 06, 2015 12:33 AM