ज्योतीप्रसाद सावंत- आजरा --झाडाखाली टाईमपास म्हणून रमी खेळणाऱ्यांना पकडून आणून तीन पानीच्या केसेस दाखल करण्याचे कर्तृत्व दाखविणाऱ्या आजरा पोलिसांवर पोलीस उपनिरीक्षक महादेव घोलप यांच्या लाचप्रकरणाने नामुष्की ओढवली असून ‘वरून कीर्तन आणि आतून तमाशा’चा हा प्रकार प्रामाणिक पोलिसांना मान खाली घालावयास लावणारा ठरला आहे.उच्च न्यायालयाच्या इमारतीसमोरच हाजगोळी येथील एका गुन्ह्यातील आरोपीकडून तब्बल ७५ हजार रुपयांची लाच घेताना महादेव घोलप याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. वरकरणी घोलप याच्यावर कारवाई दिसत असली तरी पडद्यामागचे सूत्रधार वेगळेच असल्याचे पोलीस खात्यामध्ये बोलले जात आहे. गेले आठवडाभर या प्रकरणाची तडजोड सुरू होती. अखेर मुंबई येथे या प्रकरणाची ठरलेली रक्कम देण्याचे ठरले. लाख रुपयांवरून ७५ हजार रुपयांना ठरलेला सौदा अखेर आजरा पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न निर्माण करणारा व संपूर्ण खात्याची मान खाली घालावयास लावणारा ठरला आहे.महसूल विभागातील लाचखोरीची लागण आजरा पोलीस ठाण्याला झाली आहे. तालुक्यात पोलिसांच्या आशीर्वादाने अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत, हे नाकारता येत नाही. याच पोलीस ठाण्यामधील एक तरुणफळी मात्र कर्तव्यात कसूर होणार नाही, यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे मात्र या अवैध व्यावसायिकांच्या जिवावर चिरीमिरीसाठी धडपडणारी मंडळी खात्याची प्रतिष्ठा पायदळी तुडवताना दिसतात. घोलपला अटक झाली. कारवाई होईल; परंतु ‘घोलप’ प्रकरणात नेमके कोण आहे? याचे उत्तर सापडणे गरजेचे आहे.
आजरा पोलिसांचे ‘वरून कीर्तन आतून तमाशा’
By admin | Published: August 29, 2014 11:23 PM