कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने मूक मोर्चावेळी राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. त्यामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘सारथी’ संस्था सुरू करावी. त्याचे उपमुख्य केंद्र कोल्हापूरमध्ये करावे, अशी मागणी केली होती. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख, कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा असणार आहे. शिष्यवृत्ती देखील दिली जाणार आहे. ‘सारथी’चे उद्दिष्टनिहाय काम लक्षात घेवून सकल मराठा समाजाने बी. टी. कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठातील जागेचा या केंद्रासाठी विचार करण्याची मागणी केली होती. त्याबाबत ‘सारथी’चे संचालक डी. आर. परिहार यांच्याशी देखील चर्चा केली होती. मात्र, काही कारणास्तव ‘सारथी’चे उपमुख्य केंद्र कोल्हापूरमध्ये सुरू झाले नाही. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी राज्यात ‘सारथी’ची आठ विभागीय कार्यालये आणि कोल्हापूरमध्ये उपकेंद्र सुरू करण्याची घोषणा केली आहे. कोल्हापुरातील उपकेंद्र पुढील महिन्यापासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी या केंद्राच्या नियोजित जागेची पाहणी करून अहवाल देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले आहेत. त्यादृष्टीने सध्या केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी शाहुपुरीतील बी. टी. कॉलेजची इमारतीचा पर्याय चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित विषय असल्याने कायमस्वरूपी उपकेंद्र उभारण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. दरम्यान, विचारेमाळ परिसरातील शाहू कॉलेजशेजारील शासकीय निवासस्थानांच्या इमारतीमध्ये सन २०१९ मध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह राज्य सरकारकडून सुरू करण्यात आले. तेथील जागा, उपलब्ध सुविधा लक्षात घेता या वसतिगृहाचा ‘सारथी’च्या उपकेंद्रासाठी विचार करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये हे उपकेंद्र करण्यात येवू नये, अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.
प्रतिक्रिया
कोल्हापुरात सारथीचे उपमुख्य केंद्र व्हावे, ही सकल मराठा समाजाची मागणी कायम आहे. उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सतेज पाटील यांना धन्यवाद देतो. उपकेंद्र लवकर सुरू करण्यासाठी तात्पुरते स्वरूपात बी. टी. कॉलेजच्या इमारतीचा पर्याय आहे. प्रशस्त केंद्र साकारण्यासाठी सुमारे पाच एकर जागा लागणार आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठातील जागा योग्य ठरणार आहे.
-इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक.