कऱ्हाड : बबलू मानेच्या खुनानंतर बाबर खानला दगडाने ठेचून ठार मारल्याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी मंगळवारी पाचजणांविरोधात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात आलेले दोषारोपपत्र सुमारे साडेपाचशे पानांचे असून, सर्व संशयितांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी सांगितले. सागर चंद्रकांत माने (वय २५), ऋषिकेश आनंदा शेंदरे (२३, दोघेही रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड), विशाल हिंदुराव कांबळे (२५, रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड), अक्षय सुनील शेंद्रे (२०), विक्रम ऊर्फ अक्षय विश्वास शिंदे (२८, दोघेही रा. गुरुवार पेठ, कऱ्हाड) अशी आरोपींची नावे आहेत.कऱ्हाड येथे मंडई परिसरात २० जुलै रोजी सकाळी टोळीयुद्धाचा भडका उडाला. कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या व बबलू माने यांच्यात वर्चस्ववाद होता. या दोघांच्या टोळीमध्ये वारंवार खटके उडाले होते. त्याचाच भडका २० जुलै रोजी उडाला. बबलू हा त्याच्या घरानजीकच्या चौकात वर्तमानपत्र वाचत बसला होता.त्यावेळी त्याच्या पाळतीवर असणाऱ्या बाबर खानने अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. बाबरने स्वत:जवळील रिव्हॉल्व्हरमधून बबलूवर बेछूट गोळीबार केला. त्यामध्ये बबलू गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. तर बाबरला प्रतिकार करण्यासाठी आलेली बबलूची आई गोळीबारात जखमी झाली. बबलूच्या खुनानंतर बाबर तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, जमावाने त्याला घेरले. त्याला दगडाने मारहाण केली. तसेच नजीकच पडलेली सिमेंटची पाईप उचलून ती बाबरच्या डोक्यात घालण्यात आली. त्यामध्ये बाबरचा जागीच मृत्यू झाला. बाबरच्या खूनप्रकरणी त्याचा भाऊ नासिर शमशाद खान याने कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी या प्रकरणाचा तपास केला. बबलूचा पुतण्या सागर माने, ऋषिकेश शेंद्रे, पप्पू ऊर्फ विशाल कांबळे, विक्रम ऊर्फ अक्षय शिंदे, अक्षय शेंदरे या पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडे या प्रकरणाबाबत कसून चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांनी बाबरच्या खुनाची कबुली दिली. खुनाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात सुमारे साडेपाचशे पानांचे आरोपपत्र तयार केले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या सूचनेनुसार आरोपपत्र तयार करून ते न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींच्या यादीत बबलूचे नावबाबरच्या खूनप्रकरणात आरोपींच्या यादीमध्ये पोलिसांनी मृत बबलूचेही नाव घेतले आहे. मात्र, त्याच्यावर कोणताही आरोप ठेवण्यात आला नसल्याचे निरीक्षक राजमाने यांनी सांगितले. बेकायदा जमाव जमविणे, अवजड हत्याराने खून करणे, आदी आरोप पोलिसांनी संशयितांवर ठेवले आहेत.
बाबर खूनप्रकरणी पाचजणांवर दोषारोपपत्र
By admin | Published: October 20, 2015 11:30 PM