- राम मगदूम
गडहिंग्लज(जि.कोल्हापूर) : शरद पवारांना हयातभर साथ दिलेले विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांच्या पाठीराख्यांनी उतारवयातील संघर्षात शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी माजी सभापती अमर चव्हाण हे सहकाऱ्यांसह मुंबईतील मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे 'चंदगड'च्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. २००४ मध्ये कुपेकरांचे सहकारी प्रकाश चव्हाण यांनी कुपेकरांच्याविरूद्ध बंड केले. त्यावेळी त्यांचे सख्खे पुतणे असणाऱ्या 'अमर'नी कुपेकरांना मोलाची साथ दिली. स्व. कुपेकरांच्या पश्चात पवारांनी 'चंदगड'ची उमेदवारी कुपेकरांच्या पत्नी संध्यादेवींना दिल्यामुळे कुपेकरांचे पुतणे 'संग्राम'नी बंडखोरी केली. त्यावेळीदेखील अमर व सहकारी संध्यादेवींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. परंतु, गेल्यावेळी संध्यादेवी व त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्यास समर्थता दर्शवली. त्यामुळे जुन्या सहकाऱ्याचा मुलगा म्हणून पवारांनी माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे सुपुत्र राजेश पाटील यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे कुपेकरांच्या ह्याच पाठीराख्यांनी राजेश पाटील यांनाही मनापासून साथ दिली.
दरम्यान, 'गोकुळ'च्या निवडणुकीतील उमेदवारीचा वाद आणि गडहिंग्लज साखर कारखान्यातील राजकारणामुळे अमर व सहकारी मुश्रीफ- संध्यादेवींच्याविरोधात राजेश पाटलांच्यासोबत राहिले. परंतु, त्यांनी आता शरद पवारांबरोबर राहण्याचे ठरवले आहे.
संध्यादेवींच्या भूमिकेची प्रतिक्षा!संध्यादेवी व डॉ. बाभूळकर ह्या दोघीही सध्या राजकारणात सक्रिय नाहीत. परंतु,शरद पवारांनी हाक दिल्यास त्यादेखील त्यांच्या पाठीशी उभे राहू शकतात.
'गडहिंग्लज'मधूनच सुरुवात...!शरद पवारांचे 'गडहिंग्लज'शी ऋणानुबंध आहेत.परंतु, जिल्हयाचे नेते मुश्रीफांनीच अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने शरद पवारांच्यामागे राहण्यासाठी अद्याप कुणीच पुढे आलेले नसतानाही 'लढवय्या अमर'नी हे धाडस केले आहे.
'चंदगड'च्या मेळाव्याला 'दांडी' !मंगळवारी, आमदार राजेश पाटलांनी चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील प्रमुखांचा अडकूरमध्ये मेळावा घेऊन अजितदादांसोबत जाण्याची 'सकारात्मक कारणमीमांसा' केली. परंतु, त्यांचे निकटचे सहकारी अमरसह काही सहकाऱ्यांनी दांडी मारली, ते सर्वजण शरद पवारांसोबत जाण्याची शक्यता आहे.
'भाजप'मधून लढण्यास विरोधसंध्यादेवींनी गेल्यावेळची निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर 'नंदाताई'ना 'भाजप'कडून रिंगणात उतरविण्याची चर्चा झाली. त्यावेळी 'राष्ट्रवादी'कडून लढला तरच पाठींबा, अन्यथा नाही,असं जाहीरपणे ठणकावणारे कार्यकर्ते शरद पवारांच्याबरोबर जाण्याची शक्यता आहे.