सातारा : मारामारीच्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी दहा हजारांची लाच मध्यस्तीकरवी घेताना पकडण्यात आलेल्या हवालदाराचे नाव संदीप सदाशिव खाडे (वय ३२, रा. धामणी, ता. माण) असे आहे. मात्र, त्याचा मध्यस्थ विजय विठ्ठल खाडे (रा. जाशी, ता. माण) हा फरार झाला आहे.काही दिवसांपूर्वी पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये मारामारीच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी एका तक्रारदाराला अटक न करण्यासाठी पुसेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संदीप खाडे याने तक्रारदाराकडे दहा हजारांची लाच मागितली. त्यानंतर संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे यासंदर्भात रीतसर तक्रार दाखल केली. संदीप खाडे याने त्याच्या ओळखीचा असलेला विजय खाडे याला पैसे घेण्यास सांगितले. दहिवडी-पुसेगाव रस्त्यावर बुधवारी दुपारी अधिकाऱ्यांनी सापळा लावला. विजय खाडे याने पैसे स्वीकारल्यानंतर त्याने तेथून पलायन केले. मात्र, पोलीस नाईक संदीप खाडेने पैसे मागितल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला तत्काळ अटक करण्यात आली. पुसेगाव पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)पंचानेच पाजले पाणीपोलीस ठाण्यात तक्रारदार पैसे देण्यासाठी आला होता. त्याच्यासोबत अन्य एक व्यक्ती होती. ‘तुम्ही कोण’ म्हणून खाडेने विचारले. त्यावेळी त्या तक्रारदाराने माझे चुलते असल्याचे सांगितले. खाडेने पोलीस ठाण्यात पैसे घेतले नाहीत. मध्यस्थ आणि एका व्यक्तीला खाडेने दुचाकीवरून बाहेर पाठविले. काही अंतर ते तिघे पुढे गेल्यानंतर विजय खाडेने वाटेत गाडी थांबविली आणि पैसे घेऊन तो निघून गेला. त्यानंतर ते दोघे चालत परत पोलीस ठाण्यात आले. तक्रारदारासोबत असलेल्या व्यक्तीने संदीप खाडेला ‘साहेब पाणी द्या,’ असे सांगितले. त्यावेळी खाडेने अस्सल भाषेत त्यांना शिवी देऊन ‘इथे कशासाठी आला आहेस, कळत नाही का,’ अशी त्या व्यक्तीला उलट दमबाजी केली. मात्र, ज्या व्यक्तीला खाडेने दमबाजी केली, ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून चक्क या प्रकरणातील पंच असल्याचे समजताच खाडेची चांगलीच तंतरली. शेवटी त्या पंचानेच खाडेला बिसलरी आणून अखेर ‘पाणी पाजले’, त्यावेळी खाडेचा रुबाब उतरला.
अटक टाळण्यासाठीच लाच
By admin | Published: February 12, 2015 11:27 PM