घन:शाम कुंभार ल्ल यड्रावसाखर कारखान्यांचा गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात येत असतानाच काही कारखान्यांच्या गळीत हंगामाची सांगता होत आहे. यामुळे ऊसतोड करण्यासाठी आलेले बीड, सांगोला, सोलापूरसह मराठवाडा, कर्नाटक भागातून आलेल्या कामगारांच्या तांड्यांना परतीचे वेध लागले आहेत. साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रक्रियेमध्ये अंत्यत महत्त्वाचा समजला जाणारा ऊसतोडणी कामगार वर्ग सोलापूर, बार्शी, बीड, सांगोला, लातूर, विजापूर, सोलापूर यासह कोकणातून पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या ऊसतोडण्याच्या कामी आपल्या कुटुंबासह येतो. गावाकडे फक्त वयोवृध्द माणसे घर व शेतीच्या राखणीसाठी राहतात. प्रत्येक हंगामात ऊसतोडणी कामगार आपल्या गावाकडील शेतीची कामे करुन त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून संसाराचा गाडा चालवितात. यावेळी होणारे काबाडकष्ट पावसाअभावी शेती व उद्योगाअभावी बेरोजगारी यातून मार्ग काढत संसाराच्या उदरनिर्वाहासाठी उत्पन्नाचे साधन म्हणून ऊसतोडीच्या कामावर तो येतो. प्रतिवर्षी साखर कारखान्याचे गळीत हंगाम सप्टेंबरपासून सुरू होवून मे महिन्याच्या अखेरपर्यंत चालू राहात असल्याने या कामगारांना मजुरीतून चांगले उत्पन्न मिळते. यामधून ते आपल्या गावच्या शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या साधनांची जुळणी करतात. परंतु यावर्षी पावसाअभावी पुरेसे ऊसपिक नसल्याने दरवर्षीच्या तुलनेत कमी दिवस चाललेला साखर कारखान्यांचा गळीत हंगाम व पर्यायाने पदरी पडलेले कमी उत्पन्न अशा कचाट्यात यंदा ऊसतोडणी मजूर सापडले आहेत. दरवर्षीच्या हंगामापेक्षा यंदा सुमारे दीड महिना हंगाम उसाच्या कमी उत्पादनामुळे ऊसतोडीचे काम कामगारांना बंद करावे लागत आहे. यामुळे दरवर्षीच्या तुलनेत त्यांचे उत्पन्नही कमी झाले आहे. ऊसतोडीचे काम संपल्यावर संबंधित तांड्याच्या ठेकेदार हा तांड्यातील सर्वांना मानसन्मानाने हंगामात काम केल्याची खुशाली म्हणून आहेरमाहेर करून त्यांना मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था करून त्यांच्या भागात पोहोचविण्याची व्यवस्था केली जाते.
ऊसतोड कामगारांंना परतीचे वेध
By admin | Published: February 13, 2017 11:45 PM