कोल्हापूर : दहीहंडी आणि गणेशोत्सवात सर्व मंडळे, ध्वनी यंत्रणांचे मालक, चालक आणि मंडळांनी लेसरचा वापर टाळावा. आवाज मर्यादेचेही काटेकोर पालन करावे, अन्यथा सर्व यंत्रणा जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करणार, असा इशारा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला. बुधवारी (दि. १६) अलंकार हॉलमध्ये ध्वनी यंत्रणा मालक, चालकांसोबत झालेल्या बैठकीत अधीक्षक पंडित बोलत होते. एक दिवस तुमचा असेल, पण ३६४ दिवस आमचे असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.नियमांचे उल्लंघन केल्यास ध्वनी यंत्रणा, लेसर, स्ट्रक्चरवर जप्तीची कारवाई होणार आहे. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास दोषींना पाच वर्षांपर्यंत कारावास आणि पाच ते सहा लाखांचा दंड होऊ शकतो, अशी माहिती पोलिसांनी दिली. आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील ध्वनी यंत्रणा चालक, मालक, जनरेटरधारक, वाहनधारकांची बैठक झाली. या बैठकीत पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. आसावरी जाधव, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रमोद माने यांनी मोठ्या आवाजाच्या ध्वनी यंत्रणांचे धोके स्पष्ट केले. शहर पोलिस अधीक्षक अजित टिके यांनी मंडळे, वाहनधारक, ध्वनी यंत्रणा चालक, मालक, स्ट्रक्चरवाले यांच्यासाठी नियमावली जाहीर केली. प्रबोधन करूनही नियमांचे उल्लंघन झाल्यास दोषींवर कारवाई अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.ध्वनी यंत्रणांचे चालक आणि मालकांच्या अपेक्षा जाणून घेतल्यानंतर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलिस प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. ‘ध्वनी यंत्रणांचे मालक मंडळांकडून भाडे घेत असले, तरी ते कायद्याला बांधिल आहेत. परवानगीपासून ते आवाज मर्यादेपर्यंत सर्वप्रकारची खबरदारी त्यांना घ्यावी लागेल. अन्यथा सर्व यंत्रणा जप्त करून मंडळांसह ध्वनी यंत्रणा मालक, चालक, वाहनधारक अशा सर्वांवर गुन्हे दाखल होतील.’
दहीहंडी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या एसपींचा डीजे मालकांना सज्जड इशारा; म्हणाले..
By उद्धव गोडसे | Published: August 16, 2023 6:23 PM