कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचारी संघटनेने निवडणूक कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मतदानाच्या दोन दिवस अगोदर मागे घेतला. कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने हा निर्णय घेतला. संघटनेच्या येथील लक्ष्मीपुरीतील कार्यालयात झालेल्या जिल्ह्यातील बीटप्रमुख कार्यकर्त्यांच्या सभेत हा निर्णय जाहीर करण्यात आला.अंगणवाडी मदतनीसला निवडणुकीच्या मतदानादिवशी पाळणाघर चालविण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणे मानधन व जेवण भत्ता द्यावा, निवडणुकीदिवशी काम केल्यामुळे तो दिवस खाऊसाठी भरून काढणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे व निवडणूक प्रक्रियेला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ व जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकाऱ्यांनी संघटनेच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन सकारात्मक भूमिका घेऊन चर्चा केली. या निर्णयामुळे संघटनेने सहकार्याची भूमिका घेतली आहे. सभेमध्ये चर्चेत अतुल दिघे, सुवर्णा तळेकर यांनी मार्गदर्शन केले. कलावती येलवनकर, स्वाती कल्याणकर, नीता परीट, छाया तिप्पट, विद्या पाटील, लता कदम यांनीही चर्चेत सहभाग घेतला.