कोल्हापूर : पाश्चिमात्य देशातील उंच इमारती, झगमगाटातील जीवनशैलीची आपण कल्पना, अनुकरण करतो; पण, डोक्यात विचार मात्र पाकिस्तान, बांग्लादेश अशा देशांचे ठेवतो. या स्वरूपातील विचार हे दहशतवाद, धर्मांधतेला पोषक ठरणारे आहेत. दहशतवाद, धर्मांधता संपविण्यासाठी हे मागास विचार आपण सोडले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध राजकीय विश्लेषक समर खडस यांनी गुरुवारी येथे केले. येथील श्रमिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित कॉम्रेड अवि पानसरे व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प राजकीय विश्लेषक खडस यांनी गुंफले. त्यांचा विषय ‘दहशतवाद आणि धर्मांधता’ असा होता. राजर्षी शाहू स्मारक भवनमधील या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कॉ. दिलीप पवार होते.यावेळी खडस म्हणाले, भांडवलशाही व्यवस्था स्वत:च्या फायद्यासाठी एका हातात धर्मांधता आणि दुसऱ्या हातात दहशतवादाचे भूत घेऊन अनेक खेळी करते. वित्तीय दिशेने जाणारी भांडवलशाही सट्टेबाज असते. तिच्या सुरक्षेसाठी धर्मांधता आणि दहशतवाद वाढविला जातो. हिंदू, ज्यू अशा प्रत्येक धर्मात नास्तिकतेची मोठी परंपरा आहे. पण, नास्तिकांना धर्मात स्थान नसले तरी त्यांना समाजात एक विशिष्ट जागा आहे. आज जगभरातील मुस्लिमांमध्ये जो कळीचा प्रश्न आहे, तो माझ्या दृष्टीने त्यांच्यामध्ये नास्तिकतेला जागा नसल्याचा आहे. प्रत्येकाला देव मान्य करण्याचा अथवा न करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तसा समजा एखादा नास्तिक असेल तर, त्याचा तो अधिकार तुम्हाला मान्य करायला पाहिजे. हा तिढा जोपर्यंत सुटत नाही, तोपर्यंत अनेक प्रश्न निर्माण होतात. ते येथील हिंदुत्ववादी शक्तींना फायदेशीर ठरते. जिथे ‘एमआयएम’ वाढते, तिथे भाजपच्या जागा वाढल्या असल्याचे दिसते. म्हणजे एका धर्मातील कट्टरवाद दुसऱ्या धर्मातील त्याच प्रवृत्तींना खतपाणी घालतो. हे चित्र बदलण्यासाठी देशातील उदारमतवादी मुस्लिमांनी पुढाकार घ्यावा.कॉ. दिलीप पवार म्हणाले, दहशतवादाचा उगम राजकीय हस्तक्षेपात आहे. हा हस्तक्षेप निर्माण करण्याची संधी विकसनशील देशांतून मिळते. पहिल्यांदा ते थांबविले पाहिजे. सध्याची देशातील स्थिती पाहता धर्मांधतेला सरकारचे बळ आहे की काय, अशी शंका येते. धर्मांध शक्तींचे गुन्हे उघड होत नसल्याने त्यांचे बळ वाढत आहे. हे गुन्हे उघड करण्यासाठी प्रयत्नशील असावे. बळवंत पवार यांनी प्रास्ताविक, एस. बी. पाटील यांनी स्वागत, तर आय. बी. मुन्शी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)संभाजी ब्रिगेडने आव्हान उभे केलेसंभाजी ब्रिगेडशी माझे मतभेद आहेत. मात्र, महाराष्ट्रातील ज्या टर्रेबाज, टगेबाज धर्मांध शक्ती आहेत. त्यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचे प्रकर्षाने काम संभाजी ब्रिगेडने केले आहे. त्याचे श्रेय त्यांना दिले पाहिजे, असे समर खडस यांनी सांगितले.पायरसी होते हे सुदैवछत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे शत्रू कोण, हे शरद पाटील यांनी पुस्तकाद्वारे मांडले. पण, त्यानंतर पानसरे यांनी पूर्ण महाराष्ट्राला खरे छत्रपती शिवाजी महाराज सांगितले. एका कम्युनिस्ट नेत्याने लिहिलेल्या या पुस्तकाची पायरसी होते, हे मला सुदैव वाटते, असे खडस यांनी सांगितले.
विचारांचा मागासलेपणा धर्मांधतेला पोषक
By admin | Published: December 04, 2015 12:20 AM