सावरवाडी : कोगे ते बहिरेश्वर (ता. करवीर) दरम्यान भोगावती नदीपात्रातील बंधाऱ्याचे पिलर निखळल्याने हा बंधारा धोकादायक स्थितीत आहे. बंधाऱ्याचे बांधकाम रेंगाळले असून या बंधाऱ्यावरून होणारा वाहतूक जीवघेणे ठरली आहे.
कोगे ते बहिरेश्वर दरम्यान नदीपात्रातील या बंधाऱ्याला सध्या घरघर लागली आहे. कोगे ते बहिरेश्वर दरम्यान भोगावती नदीपात्रातील हा बंधारा गेल्या ५० वर्षांपूर्वी शेतीला पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्याच्या पृष्ठभागातील दगडी बांधकाम व पिलर निखळून पडू लागले आहेत. दगडी बांधकाम जीर्ण झाल्याने यंदाच्या पावसाळा ऋतूमध्ये पुराच्या पाण्यामुळे हा बंधारा कधीही कोसळण्याची भीती आहे. अवजड वाहतुकीसाठी हा बंधारा धोकादायक बनला आहे. बंधाऱ्याच्या अनेक ठिकाणी पडझड होऊ लागली आहे. करवीर पश्चिम भागातील पंधरा गावांच्या दळणवळणाची सोय या बंधाऱ्यावरून होते. या बंधाऱ्यामुळे कोगे, बहिरेश्वर, कसबा बीड, महे आदी गावांतील आठशे एकर शेती या बंधाऱ्यामुळे ओलिताखाली येते. त्यामुळे हा बंधारा शेतकऱ्यांना वरदान ठरला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. दरम्यान पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता रोहित बांधिवडेकर, उपअभियंता माने, शाखा अभियंता आंबोळे, जिल्हा परिषेदेचे सदस्य सुभाष सातपुते आदींनी बंधाऱ्याची पाहणी केली.
चौकट : बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
गेल्या चार-पाच वर्षांपासून या बंधाऱ्याच्या पृष्ठभाग, पिलर ठिकठिकाणी कोसळलेले आहेत. बंधाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कोगे ते बहिरेश्वर या बंधाऱ्यावरून होणारी ऊस वाहतूक, चारचाकी वाहतूक व इतर अवजड वाहतुकीस बंदी घालावी, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.
कोट : कोगे ते बहिरेश्वर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी बारा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून आणखी जादा निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. पी. एन. पाटील , विधानसभा सदस्य, करवीर विधानसभा मतदारसंघ )
फोटो : कोगे बंधारा
बहिरेश्वर ते कोगे ( ता . करवीर ) दरम्यान भोगावती नदी पात्रातील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे पिलर कोसळू लागले आहेत.त्यामुळे हा बंधारा धोकादायक बनु लागला आहे